लंडन : सर्बियाच्या अग्रमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविच याने बेल्जियमच्या डेव्हिड गॉफीन याला पराभूत करत बुधवारी विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली. जोकोविच नवव्यांदा विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत पोहचला आहे. अन्य लढतीत स्वित्झर्लंडचा दिग्गज रॉजर फेडरर यानेही झुंजार विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या जोकोविचने पहिल्या सेटमध्ये एक सर्विस गमावल्यानंतर पुनरागमन करत गॉफीनला ६-४, ६-०, ६-२ असे पराभूत केले. अंतिम फेरीत पोहचण्यासाठी जोकोविचला स्पेनच्या रॉबर्टोे आगुट याच्याशी लढावे लागेल. आगुटने अर्जेंटिनाच्या २६ व्या मानांकित गुइडो पेला याला ७-५, ६-४, ३-६, ६-३ असे पराभूत केले.जोकोविचला सुरुवातीला थोडा संघर्ष करावा लागला. मात्र त्यानंतर त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याला थोडीही दयामाया दाखवली नाही. त्याने शेवटच्या १७ पैकी १५ गेम जिंकले. या विजयाबरोबर जोकोविचने ३६ व्यांदा ग्रॅँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली.दुसरीकडे, २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या फेडररने जपानच्या केई निशिकोरीचे कडवे आव्हान ४-६, ६-१, ६-४, ६-४ असे परतावले. पहिला सेट जिंकून निशिकोरीने आश्चर्यकारक सुरुवात केली. मात्र यानंतर फेडररने आपला सर्व अनुभव पणास लावत सलग तीन सेट जिंकले. त्याने यावेळी चूका करण्यास भाग पाडल्याने निशिकोरीची चांगलीच दमछाक झाली. आता अमेरिकेचा सॅम क्वेरी व स्पेनचा राफेल नदाल यांच्यातील विजेत्यासह फेडरर अंतिम फेरीसाठी भिडेल. (वृत्तसंस्था)
नोवाक जोकोविच उपांत्य फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 05:27 IST