लंडन : महिला गटातील अव्वल टेनिसपटू खेळाडू अॅश्ले बार्टी हिचे सेरेना विल्यम्सप्रमाणे एकाच वर्षात फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन या स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न सोमवारी भंगले. विम्बल्डन ओपन स्पर्धेत तिच्यावर खळबळजनक विजय मिळवून अमेरिकेच्या बिगर मानांकित अॅलिसन रिस्के हिने दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.
जागतिक टेनिस क्रमवारीत आणि स्पर्धेत अव्वल मानांकन असलेल्या आॅस्ट्रेलियाच्या बार्टीला रिस्केने ३-६, ६-२, ६-३ असे नमवून स्पर्धेबाहेर केले. ही लढत १ तास ३६ मिनिटे चालली. जागतिक क्रमवारीत ५५व्या क्रमांकावर असलेल्या रिस्केची कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पहिला सेट सहजपणे जिंकल्यानंतर २३ वर्षीय बार्टीने सामन्यावरील पकड गमावली. याचा पूरेपूर फायदा उचलत रिस्केने सामन्यात पुनरागमन केले. या २९ वर्षीय खेळाडूने नंतरचे दोन्ही सेट आरामात जिंकून कारकिदीर्तील सर्वांत मोठा विजय नोंदविला. यंदा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकणारी बार्टी विम्बल्डमध्येही जेतेपद पटकाविण्याच्या इराद्यानेच उतरली होती. २०१५ मध्ये सेरेनाने या दोन्ही स्पर्धा जिंकल्या होत्या. तिच्या कामगिरीशी बरोबरी साधण्याचे बार्टीचे स्वप्न रिस्केच्या अफलातून खेळामुळे धुळीस मिळाले. उपांत्यपूर्व फेरीत रिस्केसमोर आपल्याच देशाची दिग्गज व ७ वेळची विम्बल्डन विजेती सेरेना विल्यम्सचे तगडे आव्हान असेल. ११व्या मानांकित सेरेनाने स्पेनच्या कार्ला सुआरेझ नावारोचा ६-२, ६-२ ने सहज पराभव केला. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिने २४व्या मानांकित क्रोएशियाच्या पेट्रा मॅट्रिक हिच्यावर ६-४, ६-२ने विजय मिळविला. युक्रेनची प्रतिभावान खेळाडू दयाना यास्त्रेमस्का हिची घोडदौड ६-४, १-६, ६-२ने रोखून चीनच्या ३० वर्षीय शुआई झांग हिनेही उपांत्यपूर्व फेरी गाठली.