चीनच्या शांघायमध्ये भारतीय वाणिज्य दूतावासाने 'जगासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता' या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात जगात कृत्रिम तंत्रज्ञानाचे भविष्य घडवण्यात भारताची भूमिका या विषयावर एक महत्त्वपूर्ण आणि सखोल चर्चा करण्यात आली. शांघाय येथे भारतीय वाणिज्य दूतावासाचे प्रतीक माथुर यांनी हे खास आयोजन केले होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भविष्याला आकार देण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावतोय, या विषयावर कॉन्सुल जनरल प्रतीक माथुर यांनी आयोजित केलेल्या चर्चासत्रात विचारमंथन करण्यात आले. चीनमधील टेक महिंद्राचे रिजनल हेड मुकेश शर्मा हे या चर्चासत्राचे प्रमुख वक्ते होते. चर्चासत्रात १५ हून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या चर्चेत भारताच्या समृद्ध तांत्रिक वारशाबद्दल माहिती देण्यात आली. संस्कृत ग्रंथांपासून ते भारताच्या विविध बोलीभाषेनुसार तयार केलेल्या भाषांचे मॉडेल्स यांच्या विकासापर्यंत सखोल चर्चा करण्यात आली. जबाबदारी ओळखून वागणाऱ्या AI साठी भारताच्या वचनबद्धतेवर मुकेश शर्मा यांनी भर दिला. तसेच, पॅरिस शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी सह-अध्यक्षत्व भूषवणे हे कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देण्याच्या नेतृत्वाचे प्रतीक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
भारतात भरभराटीला येणारी स्टार्टअप इकोसिस्टम याबाबतही त्यांनी आपल्या भाषणात प्रकाश टाकला. जागतिक स्तरावर भारतीय स्टार्टअप इकोसिस्टम १९व्या क्रमांकावर आहे. तसेच, सर्वोत्तम स्टार्टअप हब असलेल्या जगभरातील टॉप १० ठिकाणांमध्ये बंगळुरूचा नंबर लागतो. भारताने एआय क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये केलेली $3 अब्जची मोठी नवीन गुंतवणूक आणि राष्ट्रीय क्वांटम मिशन यावर त्यांनी भाष्य केले. तसेच कृषी, क्लीनटेक, अंतराळ तंत्रज्ञान आणि आरोग्यसेवेमध्ये एआय प्रेरित प्रयोगांमधील प्रगती हे महत्त्वाचे टप्पेही त्यांनी अधोरेखित केले.
याव्यतिरिक्त, भाषणात एआयच्या उत्क्रांतीचा सखोल अभ्यास मांडण्यात आला, एजंटिक एआयकडे होणारा बदल, ज्यामुळे मल्टीमोडल सिंगुलॅरिटी आणि शेवटी आर्टिफिशियल जनरल इंटेलिजेंस (एजीआय) होईल असा अंदाज वर्तवण्यात आला. भारत देश धोरणात्मक फायद्यासह एआयचे भविष्य घडवण्यास सज्ज आहे. एआय क्रांतीमध्ये स्वतःला जागतिक नेता म्हणून स्थान देत आहे. जेणेकरून सर्वांसाठी सुसज्ज आणि सुरक्षित एआय वातावरण देता येईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.