डाळिंबाचा कॅलिफोर्निया म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या अजनाळे (ता. सांगोला) येथील सर्वपक्षीय पुढारी, तरुणाई गाव कोरोनामुक्त करण्यासाठी सरसावली आहे. सर्वांच्या पुढाकाराने कोविड सेंटर सुरू करून सर्वजण आपापल्या परीने रुग्णांना मोफत औषधे, नाष्टा, चहा, शुद्ध पाणीपुरवठा करून रुग्णांना आधार देत आहे. त्याच गावातील काही मद्यपी तरुण रात्री-अपरात्री विद्येचे माहेरघर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्हरांड्यात मद्यप्राशन करून रिकाम्या बाटल्या तेथेच टाकत असल्याचे निर्दशनास आले आहे.
टेम्पोच्या धक्क्याने संरक्षक भिंत पाडली
विशेष म्हणजे शाळेच्या शेजारीच बेकायदेशीर देशी-विदेशी दारूचा अड्डा आहे. येथूनच मद्यपी दारू, बीअर खरेदी करून शाळेच्या व्हंराड्यात बसून बिनधास्त रिचवत आहेत. या शाळेला संरक्षक भिंतीचे कंपाउंड असून समोर गेट आहे; परंतु अज्ञात टेम्पोचालकाने धक्का देऊन संरक्षक भिंत पडल्याने रिकामटेकडी मंडळी या शाळेत सहज प्रवेश करून आपला नियोजित कार्यक्रम उरकून घेतात, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
दारूबंदीचा ठराव करणार
याची दखल घेऊन विष्णू देशमुख, प्रा. हनुमंत कोळवले, तंटामुक्तीचे अध्यक्ष वामन लाडे यांनी शाळेची पाहणी करून मुख्याध्यापक ऐवळे यांना बोलावून लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. लवकरच ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव घेऊन सांगोला पोलीस स्टेशनला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
फोटो ओळ ::::::::::::::::
अजनाळे (ता. सांगोला) येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्यात मद्याच्या रिकाम्या बाटल्या पडल्याचे छायाचित्र.