शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांची धुळीच्या विळख्यातून सुटका करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा करमाळा नगर परिषदेचे नगरसेवक सचिन घोलप यांनी दिला आहे. शहरातील वेताळपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, गुजर गल्ली, एस.टी. स्टॅण्ड, संगम चौक ते केत्तूर नाका, पोथर नाकाकडे जाणारा रस्ता, या शिवाय मेन रोडवरदेखील सर्वत्र मोठे खड्डे पडून डांबरीकरण निघून गेले आहे. रस्ते खराब आहेत. त्यामुळे नागरिकांना धुळीशी सामना करावा लागत आहे.
शहरातील नागरिकांना डोळ्यांचे विकार, धूळ श्वसन मार्गात गेल्यामुळे सर्दी, खोकला, डोळे चुरचुरणे इत्यादी त्रास होत आहे. वाहने चालविताना अपघात होण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिक त्रस्त आहेत. या सर्व प्रकाराबाबत प्रशासन व सत्ताधारी गप्प आहेत. कोरोनाकाळात नागरिकांना धुळीमुळे आरोग्याचे त्रास होत आहे. तातडीने धुळीचा बंदोबस्त करावा अन्यथा याबाबत आम्हाला जिल्हाधिकारी, नगरविकास प्रशासन, मुंबई यांच्याकडे दाद मागावी लागेल व तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा घोलप यांनी निवेदनात दिला आहे.
-----