नगरविकासने मागविली माहिती
सोलापूर : वैराग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव असून, यासाठी नगरविकास विभागाने माहिती मागविली असल्याचे जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांनी सांगितले.
वैराग ग्रामपंचायतीने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे ठराव पाठविला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी वैराग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठविला होता. ७ फेब्रुवारीला हा प्रस्ताव नगरविकास विभागाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार नगरविकास विभागाचे कार्यासन अधिकारी वि. ना. धाईंजे यांनी नगरपालिका प्रशासनाला वैराग ग्रामपंचायतीबाबत माहिती सादर करण्याची सूचना केली आहे. यामध्ये वैराग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करताना असलेल्या स्थानिक क्षेत्रातील सर्व्हे क्रमांकासह एकूण हद्द, लोकसंख्या व बाजूची गावे याबाबत सविस्तर माहिती कळविण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यावर गावातील सुविधांसाठी शासनाच्या योजनेतील अधिक निधी मिळणे सोपे होणार आहे.