पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील देवस्थान श्री विठ्ठल बिरदेव यात्रेस आज, सोमवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ढोल-ताशांच्या निनादात ‘श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं’ च्या गजरात श्री फरांडे बाबांनी ‘हेमाड’ सोहळ्याचे दर्शन घडविले. मुख्य धार्मिक विधीस १२ वाजता सुरुवात झाली. यावेळी प्रसिद्ध भाकणूकही झाली.खेलोबा वाघमोडे (फरांडेबाबा) महाराज हेमाड खेळत मंदिरात आले. त्यांनी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी भाकणूक केली. गावचावडीत गावकामगार पाटील प्रकाश पाटील (काका) यांच्या हस्ते मानाच्या तलवारीचे, शस्त्रांचे पूजन झाले. यावेळी मानकरी, गावडे, चौगुले, कुलकर्णी, समस्त पुजारी, धनगर समाज, ग्रामस्थ, आदी उपस्थित होते. भानस मंदिरात दर्शन घेतल्यानंतर फरांडेबाबांना निमंत्रित करण्यासाठी मानकरी गेले. त्यांच्याबरोबर मानाचा घोडा, छत्र्या, ढोल, कैताळ्यांचा लवाजमा होता. परंपरेनुसार प्रकाश पाटील यांनी फरांडेबाबांना अलिंगन देऊन निमंत्रित केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर भंडाऱ्याची उधळण झाली.दुपारी अडीच वाजता श्री फरांडे बाबा हातात तलवार घेऊन उभे राहिले. श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांगभलं चा प्रचंड गजर सुरू होता. पोटावर मानाच्या तलवारीचे वार करीत फरांडेबाबा हेमाड खेळत मंदिराची प्रदक्षिणा घालून मंदिरात आले. त्यानंतर भाकणूक झाली. यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, आदी राज्यांतून लाखो भाविक येथे आले आहेत.भाकणूक सोहळ्यादरम्यान कोल्हापूर, इचलकरंजी, कागल या मार्गांवर वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहनांचा प्रचंड ताफा या भागात होता. परिवहन विभागाने विविध भागांतून जादा बसेस सोडल्या, तर तात्पुरते बसस्थानकही उभारले होते.फरांडे बाबांची भाकणूकमहाराष्ट्रात राजकीय गोंधळ मोठ्या प्रमाणात होऊन अनेक उलथापालथी घडतील. मिरचीसह डाळी महाग होतील. रोहिणीचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडेल. त्यामुळे पेरण्या अंतिम टप्प्यात होतील. येत्या पाच दिवसांत पाऊस पडेल आणि देवाची भक्ती करेल, त्याच्यावर मी कृपादृष्टी ठेवीन. खासगी वाहनांतून भक्तगण दाखलमहाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या जादा गाड्यांच्या फेऱ्या कमी झाल्याने पंचवीस टक्के महामंडळाला तोटा सहन करावा लागला असल्याची माहिती महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी अभिजित पाटील, एस. टी. शिंदे आणि एम. एस. कोळी यांनी दिली. बहुतांश भक्तांनी खासगी बसेस व खासगी वाहने घेऊन यात्रेस उपस्थिती लावली. त्यामुळे परिसरात खासगी वाहनांची गर्दी दिसत होती. पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे सोमवारी श्री विठ्ठल बिरदेव यात्रेस प्रारंभ झाला. यावेळी लाखो भाविकांनी ढोल-ताशांच्या गजरात भंडाऱ्याची उधळण केली. ‘श्री विठ्ठल बिरदेवा’च्या नावानं गजर करून परिसर दणाणून गेला. यात्रेस महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील भाविकांनी उपस्थिती लावली. दुसऱ्या छायाचित्रात हेडाम खेळताना फरांडे बाबा.
पट्टणकोडोलीत बिरदेव यात्रा उत्साहात
By admin | Updated: October 14, 2014 01:12 IST