सांगली : येथील पुष्पराज चौकातील दादूकाका भिडे मुलांच्या निरीक्षणगृहातील तीन शाळकरी मुले काल (सोमवार) पासून गायब झाली आहेत. याबाबत आज, मंगळवार सायंकाळी निरीक्षणगृहातील दादासाहेब रामचंद्र जाधव यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. प्रथमेश अण्णू शिंदे (वय १२, रा. विजापूर रस्ता, जत), उमेश जयवंत पाटील (१२, कापसे प्लॉट, सांगली) व प्रकाश नंदू मेनन (१३, सरस्वतीनगर, विश्रामबाग) अशी गायब झालेल्या मुलांची नावे आहेत. ती काळ्या खणीजवळील न्यू हायस्कूलमध्ये शिकतात. सोमवारी सकाळी सात वाजता तिघेही शाळेला जातो म्हणून निरीक्षणगृहातून बाहेर पडले होते. शाळा सुटल्यानंतर ते पुन्हा निरीक्षणगृहात परतले नाहीत. त्यांचा शोध घेण्यात आला, मात्र कुठेच सुगावा लागला नाही. ते घरीही गेलेले नाहीत. (प्रतिनिधी)तिसरी घटनादादूकाका भिडे निरीक्षणगृहात गेल्या दोन महिन्यात मुले गायब झाल्याची ही तिसरी घटना घडली आहे. यापूर्वी दोनवेळा दोन मुले गायब झाल्याची नोंद पोलिसांत आहे. आता तर एकाचदिवशी तीन मुले गायब झाली आहेत. या मुलांचा शोध लागत नसल्याने त्यांच्या पालकांंना काळजी लागून राहिली आहे.
निरीक्षणगृहातील तीन मुले गायब
By admin | Updated: November 25, 2014 23:57 IST