मनपा निवडणुकीसाठी शौचालय दाखल्याची सक्ती नाही
ईव्हीएम मशीनची तपासणी: सातारा जिल्ह्यातून मशीन येणार
सोलापूर : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करताना शौचालय दाखल्याची सक्ती नसल्याचे स्पष्टीकरण सहायक आयुक्त अभिजीत हराळे यांनी दिले. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशात उमेदवाराने शौचालयाचा दाखला १८0 दिवसात दाखल करणे गरजेचे आहे. अन्यथा सदसत्व रद्द होऊ शकते. उमेदवारी दाखल करताना शौचालयाच्या दाखल्याची गरज नाही. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शौचालयाच्या दाखल्याची सक्ती केल्याचे म्हटले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मनापासाठी या दाखल्याची गरज आहे काय अशी विचारणा अनेकांनी केली. वास्तविक निवडणूक आयोगाचा आदेश महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकच आहे. महापालिका निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून इव्हीएम मशीनचे बॅलेट युनिट २00३, कंट्रोल युनिट ८९0, मेमरी कार्ड ६६0 पुरविण्यात आले आहेत. महापालिकेकडे काही यंत्रे शिल्लक आहेत. याशिवाय सातारा जिल्ह्यातून ६0७ यंत्राची मागणी करण्यात आली आहे. यावर खटाव येथून ४0७ व माण येथून ३00 बॅलेट युनिट पुरविण्यात येणार आहेत. हुतात्मा सभागृहाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत सहायक अभियंता सारिका आकुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली या मशीनमधील पूर्वीची मेमरी डिलीट करण्याचे काम सुरू झाले आहे. प्रत्येक मशीनला तीन कर्मचाऱ्यांप्रमाणे दररोज ३00 मशीनची तपासणी करण्यात येत आहे. यात बॅटरी, मेमरीची क्षमता तपासण्यात येऊन चेसीची नोंद घेण्यात येत आहेत. एका इव्हीएममशीनवर नोटा सोडून १५ उमेदवारांची नावे बसू शकतात. प्रभागात उमेदवार जादा झाल्यास दोन मशीन जोडण्यात येणार आहेत.