सांगोल्यात आघाडी, महायुतीच्या बैठकीचे गुऱ्हाळ सुरूचअरूण लिगाडे : आॅनलाईन लोकमत सांगोलाजि.प.व पं.स.निवडणुकीसाठी इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे आघाडी व महायुतीच्या नेत्यांचा उमेदवारीवरून कस लागला आहे. बुधवारी अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येला जि.प., पं.स. उमेदवारीवरून आघाडी व महायुतीच्या नेतेमंडळींच्या बैठकीचे गुऱ्हाळ सुरूच होते. आघाडीकडून शेकापच्या कोट्यातील ४ जि.प.गटाचा तर राष्ट्रवादीच्या कोट्यातील ३ जि.प.गटातील उमेदवारीचा तिढा अद्यापही सुटला नाही. तर महायुतीकडून महुद, एखतपूर, घेरडी, नाझरे, जि.प.उमेदवार निश्चित मानले जात असून कडलास, जवळा, कोळ्याचे उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात आहेत. मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या सांगोला तालुक्यातील जि.प. व पं.स.च्या निवडणुकीसाठी शेकापचे आ.डॉ.गणपतराव देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या पक्षाची सांगोला तालुका विकास आघाडी झाली असली तरी जागावाटपाचे चित्र अद्यापही स्पष्ट झाले नाही. तर इकडे माजी आ.अॅड.शहाजीबापू पाटील(शिवसेना), श्रीकांत देशमुख(भाजप), प्रा.संजय देशमुख(स्वाभिमानी शेतकरी संघटना), सोमा मोटे(रा.स.प), खंडू सातपुते(आर.पी.आय) यांची महायुती निश्चित असली तरी तीन जि.प.जागांवरून चर्चेचे गुऱ्हाळ जागेवर अडकले आहे. अजूनही काँग्रेस(आय)जि.प., पं.स.च्या निवडणूक स्वबळावर लढणार की आघाडीत सामील होणार, याचा निर्णय अद्यापही झाला नाही. बुधवार १ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मात्र अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येला आघाडी व महायुतीकडून जागांचा तिढा सुटल्याचे सांगितले जात असले तरी इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे नेतेमंडळींची मोठी अडचण निर्माण झाली आहे. शेकापचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या एकट्या कोळ्यात जिल्हा परिषदेसाठी तब्बल १८ जण इच्छुक होते. परंतु, नेत्यांच्या शब्दाखातर १३ जणांनी शर्यतीतून माघार घेतली आहे. तर अॅड.सचिन देशमुख, संभाजी आलदर, नारायण पाटील, श्रीमंत सरगर, अॅड.दयाप्पा आलदर हे ५ जण अद्यापही इच्छुक असल्याचे समजते. तर महायुतीकडून तीनवेळा जि.प.ची निवडणूक लढविलेले शिवाजी घेरडे व नवखे प्रदीप सावंत यांच्यात रस्सीखेच असल्याचे समजते. दुसरीकडे शेकापच्याच बालेकिल्ल्यातील महूद बु॥ जि.प.गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्याने विठ्ठल बागल की वसंत जरे यांच्या उमेदवारीवर अद्यापही निर्णय झाला नाही. राष्ट्रवादी आयत्यावेळी महादेव गायकवाड यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर महायुतीकडून गोविंद जरे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने ते कामालाही लागले आहेत. एखतपूर जि.प.गटात आघाडीकडून शहाजीराव नलवडे यांनी भेटीगाठीवर भर दिल्याने त्यांचीही उमेदवारी निश्चित मानली जाते. तर महायुतीकडून युवक नेते अतुल पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांनी मागील काही महिन्यांपासून एखतपूर गट अक्षरश: पिंजून काढला आहे. नाझरे गटातून आघाडीकडून दादाशेठ बाबर, अमोल खरात इच्छुक असल्याचे समजते तर महायुतीकडून विजय शिंदे यांची उमेदवारी निश्चित झाल्याने ते कामालाही लागले आहेत. जवळा जि.प.गटातून आघाडीकडून संगीता सुरवसे, त्रिवेणी मागाडे इच्छुक आहेत तर महायुतीकडून मंगल कसबे यांची उमेदवारी निश्चित आहे. कडलास जि.प.गटातून आघाडीकडून संगम धांडोरे यांच्या पत्नीची उमेदवारी निश्चित मानली जात असून महायुतीकडून श्रीमती चंदनशिवे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. घेरडी जि.प.गटातून आघाडीतून अनिल मोटे तर महायुतीकडून रा.स.प.चे सोमा(आबा)मोटे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने तेही कामाला लागले आहेत. सर्वच पं.स.गणातील आघाडी व महायुतीचे उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरु असली तरी आघाडी व महायुतीकडून बऱ्याचशा गणातील उमेदवार निश्चित असल्याचे समजते. कारण आघाडीचा उमेदवार कोण असेल? व महायुतीचा उमेदवार कोण असेल? यावरच नेतेमंडळी पं.स.उमेदवारांचे पत्ते खुले करणार असल्याचे दिसून येत आहे. जि.प., पं.स. निवडणुकीसाठी महायुती निश्चित मानली जात असली तरी एक-दोन जागांवर अद्यापही चर्चा सुरु आहे. अॅड. शहाजीबापू पाटील यांनी नगरपरिषदेप्रमाणे जि.प.,पं.स.साठी आमची महायुती कायम असल्याने जागांवरून महायुती अभेद्य राहणार असल्याचे सांगितले आहे. श्रीकांत देशमुख यांनी मात्र महायुतीच्या वृत्ताला अद्यापही दुजोरा दिलेला नाही.
सांगोल्यात आघाडी, महायुतीच्या बैठकीचे गुऱ्हाळ सुरूच
By admin | Updated: February 2, 2017 16:16 IST