सोलापूर: यंदाचा शिक्षक दिन जरा हटके आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाच सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते पावणे पाचच्या दरम्यान होणारे भाषण शिक्षक आणि विद्यार्थ्यांना ऐकण्याची संधी मिळणार आहे़ केंद्राचे पत्र सर्व विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व महापालिका आयुक्तांना पाठविण्यात आले आहे़ त्यामुळे मोदींचे भाषण ऐकवण्यासाठी शाळांमध्ये धावपळ सुरू झाली आहे.केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे २७ आॅगस्टचे अर्धशासकीय पत्र सर्व शाळांनी ‘माय स्कूल इन’ वरुन डाऊनलोड करून त्यानुसार तयारी करावी असे आदेश निर्गमित केले आहेत़ सोलापूर जिल्ह्यात जि़प़च्या २८७२ शाळा आहेत़ सर्व शालेय विद्यार्थ्यांना हे भाषण ऐकण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे आदेश असल्यामुळे खासगी, मनपा, नगरपालिका शाळांमध्ये शिक्षकदिनी बहुतांश ठिकाणी मोदी अन् मोदींचीच चर्चा ऐकायला मिळणार आहे़या भाषणाचे थेट प्रसारण टीव्ही, इंटरनेट, रेडिओ आदींमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे, असे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत़ याबाबत केंद्र शासनाने व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन या कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली आहे़ ज्या शाळांमध्ये केंद्र शासनाची आयसीटी योजना आहे त्या ठिकाणी प्रोजेक्टरचा वापर करून हा कार्यक्रम दाखवावा, असे सूचविले आहे़--------------------------भाषण ऐकणाऱ्यांची नोंदमोदींचे भाषण किती विद्यार्थ्यांनी ऐकले याची नोंद घेतली जाणार आहे़ शाळेमधील विद्यार्थी पटसंख्या आणि त्यापैकी भाषणाप्रसंगी उपस्थित असलेल्या विद्यार्थी संख्या याची माहिती त्या दिवशी पाठविण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत़ या कार्यक्रमाचे सनियंत्रण करण्यासाठी आयुक्त शिक्षण यांच्या कार्यालयात शिक्षण सहसंचालकांसह दोन शिक्षण उपसंचालकांचा कृती गट स्थापन केला आहे़---------------------जिल्हा परिषदांच्या सर्व शाळांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाच सप्टेंबर रोजी होणारे भाषण प्रसारित करावे असे सांगितले आहे़ ज्या शाळांमध्ये वीज नाही, त्यांनी ज्या ठिकाणी विद्यार्थी बसू शकतील अशा हॉलमध्ये भाषण ऐकावे तेही शक्य नसेल तर रेडिओद्वारे हे भाषण मुलांसाठी ऐकवावे असे सुचविले आहे़- राजेंद्र बाबर, जि़प़ प्राथमिक शिक्षणाधिकारी
शिक्षक दिनी नरेंद्र मोदींची ‘पाठ’शाळा!
By admin | Updated: September 4, 2014 01:13 IST