तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींपैकी उपळाई खुर्द या अतिसंवेदनशील गावात कै. गणेश कुलकर्णी गट आणि कै. विष्णुपंत पाटील व महादेव परिवार या गटात चुरस पहायला मिळू लागली आहे. ११ जागांसाठी २४ उमेदवार रिंगणात असून, प्रामुख्याने दुरंगी लढत आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच आमदार शिंदे गट व विरोधी गट अशी थेट निवडणूक आहे.
वर्षांपासून कुलकर्णी समर्थक सत्तेवर आहेत. सध्या माजी उपसरपंच ज्योती कुलकर्णी व सविता राऊत, सरपंच सुनीता कुलकर्णी व वैशाली कदम, बबनराव शिंदे साखर कारखान्याचे एमडी संदीप पाटील व निवृत्त सैनिक मेजर श्यामराव कदम, रानबा कदम व दीपक पाटील अशा प्रामुख्याने लढती पाहायला मिळणार आहे.
राज्यात अधिकाऱ्यांचे गाव म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या उपळाई बुद्रूक येथे १५ जागेसाठी ३३ उमेदवार रिंगणात असून, प्रामुख्याने दुरंगी लढत पहायला मिळत आहे. गतवर्षी एकत्रित सत्तेत असलेले स्थानिक गट एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. स्थानिक पातळीवर निवडणूक होत आहे. मोठ्या संख्येने तरुणाई दिसू लागली आहे. विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे संचालक सीताराम गायकवाड व माजी सरपंच संजय नागटिळक या गटाविरोधात आमदार बबनराव शिंदे यांचे व्याही अजितकुमार देशमुख, माजी आमदार धनाजी साठे यांचे भाचे दीपक देशमुख यांच्यासह झाडबुके, शेंडे, आखाडे आदी गटातील प्रमुख कार्यकर्ते एकत्रित आल्याचे दिसत आहे. पदवीधरचे तालुकाध्यक्ष संदीप गोरे व सभापती विक्रमसिंह शिंदे यांचे मेव्हणे अभिषेक देशमुख एकमेकांसमोर निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. अण्णासाहेब देशमुख हे एकमेव विद्यमान सदस्य निवडणुकीच्या आखाड्यात उभे आहेत.
----