ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. 24 - उजनी धरणातून भीमा नदी पात्रात बुधवारी सोडलेले पाणी मीरे बंधा-यात पोहोचले आहे. दरम्यान शनिवारी दुपारी उजनीतून चार हजार क्युसेक्सने पाणी वाढविण्यात आले आहे. यामुळे सध्या भीमा नदीपात्रात ७१०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग येत आहे. यामुळे रविवारी संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत हे पाणी पंढरपूर बंधाºयात पोहोचणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सर्जेराव शिंदे यांनी दिली.
उजनी धरणातून बुधवारी भीमा नदीपात्रात सुरूवातीला १६०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते. गुरूवारी यामध्ये १५०० क्युसेक्सची वाढ केली. तर रविवारी दुपारी १ वाजता पुन्हा चार हजार क्युसेक्स पाण्याची वाढ करण्यात आली आहे. यामुळे सध्या भीमा नदीपात्रात ७१०० क्युसेक्सचा विसर्ग उजनी धरणातून वाहत आहे.
बुधवारी व गुरूवारी सोडलेल्या ३१०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग मीरे बंधा-यात शनिवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोहोचला आहे. पुन्हा सोडलेला ४००० क्युसेक्सचा विसर्ग अद्याप पुढील ३१०० क्युसेक्स पाण्याच्या विसर्गापर्यंत पोहोचलेला नाही. मात्र रविवारी सकाळपर्यंत दोन्ही पाण्याचा विसर्ग एक होऊन रविवारी रात्री ९ वाजेपर्यंत हा ७१०० क्युसेसचा विसर्ग पंढरपूर बंधाºयात पोहोचेल, असे सर्जेराव शिंदे यांनी सांगितले.
पंढरपूर तालुका हद्दीतील भीमा नदी पात्रात अवैध वाळूचोरीमुळे मोठे खड्डे पडले आहेत. ३ फूटापासून ५ फूटापर्यंतचे खड्डे नदीपात्रात असल्याने पाणी वाळूत मोठ्या प्रमाणात मुरत आहे. शिवाय हे खड्डे भरून पाणी पुढे सरकण्यासाठी वेळही लागत आहे. रविवारी सकाळी पिराची कुरोलीत पाणी येईल. मात्र तिथून पुढे किमान ८ तास पंढरपूर बंधाºयात हे पाणी पोहोचण्यासाठी लागणार आहेत. खेडभोसे, व्होळे, कौठाळी, करोळे, कान्हापूरी या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी वाळू उपसा केल्याने पाणी पुढे सरकण्यास वेळ लागत आहे.
पाण्याचा विसर्ग शनिवारी दुपारी १ वाजता वाढविण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याचा वेगही वाढेल. भीमा नदी पात्रात ब-याच गावच्या शेतकºयांनी विद्युतपंप बसविले आहेत, ते काढून घ्यावेत. शिवाय चंद्रभागा वाळवंटात पडलेले खड्डेही प्रशासनाने बुजवून घ्यावेत. स्रानासाठी चंद्रभागा नदी पात्रात येणाºया भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने दखल घेतली पाहिजे.
- सर्जेराव शिंदे, कार्यकारी अभियंता, पंढरपूर विभाग
उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग यावेळी जास्त आहे. त्यामुळे पाणी वाळवंटात बरेच वर येणार आहे. चंद्रभागा वाळवंटात वाळूचोरीमुळे पडलेले खड्डे बुजविण्यास आपण शुक्रवारीच सांगितले आहे. भाविकांच्या जीवाला धोका नको म्हणून आम्ही खड्डे बुजविण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी पाणी पंढरपुरात पोहोचेपर्यंत सर्व खड्डे आम्ही बुजविणार आहोत. तहसील आणि पोलीस नगरपालिकेला खड्डे बुजविण्यास सांगतात. अवैध वाळू चोरीकडे मात्र दुर्लक्ष करतात.
- अभिजीत बापट, मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपालिका