सावळेश्वर येथील गंगा ज्वेलर्सचे मालक मारुती रेवणकर यांना गावातीलच दोघाजणांनी बनावट सोन्याच्या साखळ्या देऊन सहा लाख दहा हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर, मोहोळ पोलिसांनी २६ जानेवारी रोजी पाच जणांना अटक केली होती. या पाच जणांच्या चौकशीत फसवणूक करणाऱ्या एजंटचे धागेदोरे दिल्ली येथे असल्याचे तपासात निदर्शनास आल्यावर तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे, प्रवीण साठे, शरद डावरे यांचे पथक २ फेब्रुवारी रोजी दिल्लीला गेले. तेथून दोघांना ताब्यात घेऊन मोहोळमध्ये आणले. त्यांना येथील न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली.
या तपासात सराफ बाजार, हापूड उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतलेल्या गौरव संजय अग्रवाल यांच्याकडून १५४ अंगठ्या, दहा मंगळसूत्र, २० सोन्याच्या साखळ्या, मंगळसूत्रांची ९ पेंडल, ११ नेकलेस, कानातील व गळ्याच्या साइटच्या पट्ट्या यासह सराफ कट्टा सांगली व पिसेवाडी येथून ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून ९३० ग्रॅम सोने व साडेसात किलो चांदी व नकली सोने बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल असा सुमारे ५८ लाख पाच हजार ३१८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. ही कामगिरी तपासी अधिकारी संतोष इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण साठे, शरद डावरे यांनी पार पाडली.
आतापर्यंत अटक केलेल्या आराेपींची नावे
याप्रकरणी आतापर्यंत इस्माईल युनूस मणियार (रा. सावळेश्वर, ता. मोहोळ), मनोज मधुकर बनगर (रा. पिसेवाडी, ता. आटपाडी), बळीराम महादेव यादव (रा. भुताष्टे, ता. माढा), नवनाथ किसन सनगर (रा. कोल्हापूर), योगेश श्रीगुरेलाल शर्मा (रा. सराफ कट्टा, सांगली), गौरव संजय अग्रवाल, अंकुश अशोक गोयल (दोघेही रा. सराफ बाजार, जि. हापूड, उत्तर प्रदेश) या सात जणांना अटक केली आहे, तर पप्पू ऊर्फ दावल तांबोळी, बबलू ऊर्फ इसाक पठाण, बबलू ऊर्फ सद्दाम तांबोळी (सावळेश्वर) व प्रसाद पंडित (कोल्हापूर) हे चार जण अद्याप फरार आहेत.
फोटो
०८मोहोळ-क्राईम
जप्त केलेल्या दागिन्यांसह हापूड येथील दोघे आरोपी. सोबत पोलीस निरीक्षक अशोक सायकर, तपासी अधिकारी संतोष इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण साठे, शरद डावरे.