कोल्हापूर : विद्रोही चळवळ ही जाती घट्ट करण्याची चळवळ नसून, माणूस जोडण्यासाठीच ही चळवळ आहे. चळवळीसाठी पैशांची गरज लागत नाही, तर विचारांची पक्की बैठक असावी लागते. हीच विचारांची बैठक विद्रोही चळवळीमध्ये आहे, असे प्रतिपादन विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळके यांनी केले. दसरा चौकातील संत जनाई नगरी, मुस्लिम बोर्डिंग सांस्कृतिक हॉल येथे आज, रविवारी बारावे विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. संमेलनाध्यक्षपदी डॉ. भारत पाटणकर होते. पोळके म्हणाले, विषमतावादी व जातीयवादी कधीच इतिहास घडवू शकत नाहीत. क्रांती आणि परिवर्तन काही पटकन होत नाही तर त्यासाठी संयम बाळगावा लागतो. अशा साहित्य संमेलनातून विचारांचे प्रबोधन होतो आणि क्रांतीची ज्योत पेटते. अस्मिता निर्माण करण्यासाठी जातीयतेची गरज लागत नाही. प्रमुख पाहुणे अॅड. अण्णाराव पाटील म्हणाले, जोपर्यंत शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे विचार समाजात रूजत नाहीत. तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही. हे विचार युवापिढीमध्ये रूजविण्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर केला पाहिजे. असे झाले ठराव--शासकीय कार्यालयातून देव-देवतांच्या प्रतिमा काढण्यात याव्यात.--खैरलांजी ते खर्डा या घडलेल्या घटना म्हणजे दलित अत्याचार वाढलेला आहे. याचा निषेध विद्रोही करते. --महाराष्ट्र शासन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास प्रत्येक वर्षी २५ लाख रुपये देते, याचा निषेध करण्यात आला. तसेच हे पैसे देण्याचे ताबडतोब बंद करावे, अन्यथा राज्याचा सांस्कृतिक कार्यमंत्री व अर्थमंत्री यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही.
माणूस जोडण्यासाठीच विद्रोही चळवळ : पोळके
By admin | Updated: August 3, 2014 23:34 IST