बार्शी तालुक्यात सुमारे १२ हजार हेक्टर क्षेत्रावर उडदाची, तर ५० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. ही दोन्ही पिके कमी कालावधीची आहेत. ऐन फुले व शेंगा लागण्याच्या वेळीच पावसाचा खंड पडला व फुले गळून गेली. जो कसाबसा आला होता. दरही चांगला होता. त्यामुळे चार पैसे अधिक मिळतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. त्याला ही गेल्या चार-पास दिवसांपासून पाऊस लागून राहिल्याने काढणीसाठी धावपळ उडू लागली आहे. उडीद काढायचा तर मळणीयंत्र मिळेपर्यंत ते पावसात भिजू लागल्याने पांढरा पडण्याचा धोका आहे. तसेच पावसात भिजल्याने दर ही कमी मिळतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे तिहेरी नुकसान होऊ लागले आहे.
.........
चौकट
बाजारात सध्या दहा हजार कट्टे उडदाची आवक होत आहे. पावसामुळे भिजलेला व ओला उडीद येऊ लागल्याने त्याला दरही कमी मिळत आहे. बुधवारी ६ हजार ते ६९०० हजार रुपये प्रतिक्विंटल दर होता. मागील दहा दिवसात जवळपास सातशे ते एक हजार रुपये दर कमी झाले आहेत. असे असले तरी चांगल्या मालाला चांगला दर मिळत आहे.
-सचिन मडके, व्यापारी
........
मजूरही मिळेना
कांदा लागवड आणि उडीद काढणी एकत्र आल्याने शेतकऱ्यांची धावपळ होऊ लागली आहे. पिके काढणीसाठी व नवीन लागवडीसाठी मजूर मिळणेदेखील अवघड झाले आहे आणि त्यात वरून पाऊस सुरू आहे.