अमरसिंह खांडेकर, ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. १२ - १६ वर्षापासून राज्यातील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात सुमारे २२,५०० प्राध्यापक व ३५०० कर्मचारी काम करीत आहेत. २०१४ साली कायम विनाअनुदानित हा शब्द काढून यासाठी लागणारा स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतला. मात्र मागील तीन वर्षापासून प्राध्यापकांना ताटकळत ठेवणा-या शासनाला जाग आणण्यासाठी फेब्रुवारी २०१७ च्या बारावी परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अमरसिंह खांडेकर यांनी दिली. या आंदोलनामुळे राज्यातील बारावीच्या १२ लाख विद्यार्थ्यांवर परिणाम होणार आहे.
न्यू इंग्लिश स्कूल सांगोला येथे शाळा कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. जे. खडतरे, प्राचार्य व्ही. व्ही. वाघमोडे, उपप्राचार्य एन. डी. माने, पुणे विभाग कृती समितीचे संघटक प्रा. व्ही. एम. खंदारे, प्रा. सुनिल भोर, प्रा. पाटील यांच्यासह जिल्ह्यातील महाविद्यालयांचे प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीमध्ये कायम शब्द वगळलेल्या शाळांना १०० टक्के अनुदान द्यावे, जून्या शिक्षकांवर अन्याय करणाºया शाळांची संच मान्यता व मूल्यांकन तपासणी यादी जाहीर करू नये, अतिरिक्त शिक्षकांना तत्काळ सेवेत सामावून घ्यावे, या प्रमुख मागण्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. २०१४ मध्ये उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचा कायम हा शब्द शासनाने काढला. परंतु तीन वर्षे झाली तरी पात्र शाळांची यादी जाहीर केली नाही. शासनाने आजवर एक रूपयांचेही अनुदान दिले नाही. विनावेतन प्राध्यापकांना काम करावे लागत आहे. त्यामुळे राज्यातील २२,५०० प्राध्यापक व ३,५०० कर्मचाºयांची परिस्थिती बिकट झाली आहे. याकडे शासनाने पूर्ण दुर्लक्ष केल्याने फेबु्रवारी २०१७ मध्ये होणाºया बारावीच्या परिक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील तोंडी परीक्ष, प्रात्यक्षिक परिक्षा, सुपरव्हीजन, पेपर तपासणी आदी कामे केली जाणार नाहीत.
१६ जानेवारीला पुणे येथील शिक्षक संचालक, शिक्षण आयुक्त कार्यालय, एचएससी बोर्ड कार्यालयावर संघटनेचे राज्य अध्यक्ष टी. एस. नाईक यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील १२ लाख विद्यार्थ्यांचे या आंदोलनामुळे नुकसान होणार आहे. राज्यातील प्राध्यापकांनी सामुहिक रजा टाकून १६ जानेवारीला पुणे येथील गांजवे चौक येथे उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अमरसिंह खांडेकर यांनी केले आहे.
सूत्रसंचालन प्रा. एन. के. देशमुख यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष प्रा. निलेश नागणे यांनी केले. प्राध्यापक मिलींद देशमुख यांनी आभार मानले.