सोलापूर : राजकारणी आणि कलाकारांना अधिक मित्र नसतात; पण असलेले विचार, आचार आणि जवळीकतेने होतात. या दोन्ही पेशांतील लोकांना स्वत:चे दु:ख व आनंद विसरून समाजासाठी मुखवटे घालून फिरावे लागते. यामुळे त्यांचे खरे चेहरे कधीच उजेडात येत नाहीत, असे प्रतिपादन सिने व नाट्य अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी केले.उद्योग बँकेच्या गणेशोत्सव व्याख्यानमालेत मंजुषा गाडगीळ यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीमध्ये त्या बोलत होत्या. मी ज्या कुटुंबातून आले ते कुटुंब संस्कारक्षम होतं. यामुळे माझ्यावर चांगले संस्कार झाले आहेत. सुरूवातीला मला नृत्याची आवड होती. टी.व्ही़ किंवा गाणे लागल्यानंतर वाकडे—तिकडे नाचत होते. माझ्यात दडलेल्या नृतिकेला ओळखून माझ्या आईने नृत्याच्या क्लासला जाण्याची मुभा दिली. यामुळे शिकत गेले आणि या क्षेत्रात आले. पालकांनी आपल्या मुलांमधील सुप्त गुण ओळखून त्यांना त्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे असून, त्यांच्यावर चांगले संस्कारही होणे गरजेचे आहे. मुलांवर पालकांमुळेच नाही तर समाजामुळेही संस्कार होत असतात; मात्र मुलांच्या जडणघडणीमध्ये पालकांनी दक्ष राहून त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. मुले आज कोणत्याही बीभत्स गाण्यांवर नृत्य करतात. याबाबत खंत व्यक्त करीत त्यांच्यासाठी खास चांगली गाणी निवडाव्यात, यामुळे मुलांवर चांगले संस्कार होण्यास मदत होणार आहे. मालिकांविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, महिला मालिकांशी एकरूप होत असल्याने त्यांना सर्वाधिक मालिका आवडतात. रोज सोप म्हणजे दररोज दिसणाऱ्या मालिकांविषयी महिला नाराजी व्यक्त करीत असल्या तरी पाहण्याच्या वेळा मात्र कधीच टाळू शकत नाहीत. प्रत्येक गोष्ट स्वत:ला घडण्यासाठी आहे, असे समजून काम केल्यास निश्चितच यश मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजकारणी, कलाकारांना मुखवटे घालावे लागतात : भार्गवी चिरमुले
By admin | Updated: September 3, 2014 00:53 IST