आॅनलाइन लोकमत सोलापूरमंगळवेढा दि २६ : तामदर्डी येथील भीमा नदीच्या पात्रातून बेकायदा 6 लाख रुपये किंमतीची 150 ब्रास वाळू चोरून त्याचा शासकीय जमीनीत साठा करून त्याची विक्री केल्याप्रकरणी धनंजय उर्फ पप्पु बाबूराव पुजारी रा. तामदर्डी, संभाजी चंद्रकांत गवळी,रा. भालेवाडी, संतोश अर्जुन कारंडे रा. तळसंगी, अमोल चंद्रकांत कोळी, रा. अचनहळ्ळी,ता.जत या तिघांविरुध्द वाळू चोरी व पर्यावरणाचा ऱ्हास केल्याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रीय लवादाने वाळू उपशावर निर्बंध घातले असतानाही भीमा नदीच्या पात्रातून मोठया प्रमाणात वाळू तस्कर वाळू चोरी करीत असल्याच्या घटनेत दिवसेंंदिवस वाढ होत आहे. तामदर्डी येथील भीमा नदीच्या पात्रातून वरील तिघांने दि. २५ एप्रिल रोजी रात्री १२ च्या सुमारास शासकीय जागेत १५० ब्रास ६ लाख किंमतीच्या वाळूचा साठा केला होता. पोलीस निरिक्षक रविंद्र शेळके यांच्या पथकाने मध्यरात्री वाळू साठ्यावर छापा टाकून एम.एच.१३ ए.एक्स.२८२३, एम.एच.१३ ए.एक्स.२८२५,एम.एच.१० ए.डब्ल्यू.७६२४ या तीन गाडयासह एकूण ५१ लाख रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त केला आहे. पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांच्या आदेशाने वाळू कारवाईसाठी धडक मोहीम राबवली जात असून पोलीसांचे पक्के भीमानदी काठी वाळू माफीयांचा शोध घेवून कारवाई करीत आहेत. त्यामुळे वाळू माफीयांचे धाबे दणाणले आहेत. पोलीसांनी वरील संभाजी गवळी, संतोष कारंडे, अमोल कोळी, यांना मंगळवारी अटक करुन न्यायालयात उभे केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान वाहनचालकांनी आपल्या गाडीच्या नंबरवर चुना अथवा काळा रंग लावून वाळू वाहतूक सुरु करण्याचा नवा पायंडा पाडला आहे. तसेच वाळू नेताना जणतेला व पोलीसांना दिसू नये पॅक बॉडी ट्रकचा वापर केला जात आहे. पोलीसांनी आता पॅक बॉडी ट्रक व विनाक्रमांकाच्या गाड्यावर करडी नजर ठेवली आहे.
तामदर्डी येथे वाळू साठ्यावर पोलीसांचा छापा, चौघांविरूध्द गुन्हे दाखल, मंगळवेढा पोलीसांची कामगिरी
By admin | Updated: April 26, 2017 14:05 IST