सांगोला : शतकोटी वृक्षलागवड योजनेचा सांगोला तालुक्यात बोजवारा उडाला आहे. ७६ ग्रामपंचायतींनी आतापर्यंत ७५ हजार वृक्षलागवडीच्या उद्दिष्टापैकी ५४ हजार वृक्षलागवडीचा कागदोपत्री अहवाल पंचायत समिती कार्यालयाकडे सादर केला आहे. गेल्या महिनाभरात नेमके एवढय़ा मोठय़ा संख्येने कोठे व कधी वृक्षलागवड केली याबाबत ग्रामस्थांतून चर्चा होत आहे.
पर्यावरण संतुलन राखण्यासाठी शतकोटी वृक्षलागवड योजनेचा कार्यक्रम गेल्या महिन्यापासून सांगोला तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींमधून सुरू आहे. या योजनेतून ७६ ग्रामपंचायतींपैकी छोट्या ग्रामपंचायतींना ५00, मध्यम १000 तर मोठय़ा ग्रामपंचायतींना २000 अशाप्रकारे ७५ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
मघा नक्षत्रात सलग दहा दिवस खळखळून वाहणारा पाऊस झाल्याने वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. वृक्षलागवडीसाठी सुस्ते (ता. पंढरपूर) येथील रोपवाटिकेतून कडुलिंब, चिंच, जांभूळ, आवळा, करंज, सीताफळ, बांबू, असेसिया अशा विविध जातींच्या ७५ हजार रोपांची आयात केली.
तालुक्यात शतकोटी वृक्षलागवड योजना सक्षमपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच वाटंबरे, यलमार मंगेवाडी, वाढेगाव गावातून टाळ-मृदंगाच्या निनादात 'झाडे लावा, देश जगवा' असा नारा देत ग्रामस्थांतून वृक्षदिंडीच्या माध्यमातून शतकोटी वृक्षलागवडीचा शुभारंभ केला.
गेल्या महिनाभरापासून ग्रामपंचायती आपापल्या नियोजनानुसार जिथं रिकामी जागा आहे अशाठिकाणी रस्त्याच्या दुतर्फी, सार्वजनिक ठिकाणी, शासकीय-निमशासकीय आवार, शाळा, हायस्कूल, अंगणवाडी, स्मशानभूमी आदी ग्रामपंचायतीच्या हद्दीतून वृक्षलागवडीचा कार्यक्रम सुरू आहे. एकीकडे ग्रामपंचायत आम्ही आमच्या हद्दीत अमुक इतकी वृक्षलागवड केल्याचा कागदोपत्री अहवाल पंचायत समिती कार्यालयाकडे सादर करीत असताना ग्रामस्थांना मात्र कोठे व कधी वृक्षलागवड केली, याचा मागमूससुद्धा नाही. त्यामुळे सांगोला तालुक्यात शतकोटी वृक्ष लागवडीचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
---------------
शतकोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम सक्षमपणे राबविण्यासाठी आठ ग्रामपंचायतींमागे एका विस्तार अधिकारी नियुक्त केला आहे. ग्रामसेवकांनी वृक्षलागवडीचा अहवाल कार्यालयाकडे सादर केला असला तरी प्रत्यक्षात संबंधित ठिकाणी जाऊन वृक्षलागवडीची पाहणी होणार आहे. यामध्ये ग्रामसेवकांनी हलगर्जीपणा केल्याचे आढळल्यास कारवाई केली जाणार आहे - राहुल गावडे, गटविकास अधिकारी
---------------
शतकोटी वृक्षलागवड योजनेच्या माध्यमातून ७६ ग्रामपंचायतींनी ७५ हजार उद्दिष्टापैकी ५४ हजार वृक्षलागवड केल्याचा अहवाल संबंधित ग्रामपंचायतीने लेखी स्वरूपात इकडील कार्यालयाकडे सादर केला आहे. - संजय बुवा, विस्तार अधिकारी, पं. स., सांगोला