यंदाच्या महापुराने शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे आर्थिक चक्र बिघडून ठेवले आहे. अक्कलकोट तालुक्यात बोरी, हरणा, भीमा, सीना या चारही नद्यांना महापूर येऊन गेला यामुळे त्या त्या परिसरातील काही ट्रान्स्फॉर्मर, खांब वाहून गेले. हजारो खांबे तुटून पडली आहेत. ते सर्व पूर्ववत करण्यासाठी शासनाने तत्काळ निधीही मंजूर केला. त्यानंतर तालुक्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. आतापर्यंत २ हजार ५०० खांबाचे काम पूर्ण झालेले आहेत. उर्वरित १०० खांबाचे काम सुरू आहे.
अद्याप मैंदर्गी, दुधनी, तडवळ, करजगी या भागातील कामे प्रलंबित आहेत. यामुळे या भागातील हजारो शेतकऱ्यांचे शेतीपंप पाणी असूनही बंद आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी शेतकरी, जनावरांचे हाल सुरू आहेत. काही शेतकऱ्यांनी आज,उद्या वीज सुरू होईल, अशी अपेक्षा ठेवून रब्बीतील गहू, हरभरा या पिकांची पेरणी केली. तर काही शेतकरी वीज जोडणी झाल्यानंतर पेरणी करू हा उद्देश ठेवून वाट पाहत आहेत. परिणामी शेकडो हेक्टर क्षेत्र पेरणीविना तसेच आहे.
वीज जोडणी विलंब होण्याची कारणे
अजूनही काही भागात चिखल असल्यामुळे पोल घेऊन जाणारी वाहने जात नाहीत. सर्वत्र झाडेझुडपी वाढल्यामुळे घटनास्थळी जाऊन काम करणे जिकिरीचे बनले आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतात उभा आहे. तो कारखान्याला गेल्याशिवाय काम करणे अशक्य आहे. अशा विविध अडचणीमुळे आजही १५०० शेतकऱ्यांच्या शेतात वीज चालू करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत.
कोट :::::::::::
मागील एक महिन्यापेक्षा जास्त दिवसात शेकडो कर्मचारी काम करीत आहेत. महापुरात महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. तरीही तब्बल २ हजार ५०० पेक्षा अधिक विजेचे खांब नव्याने उभारले आहेत. ज्या ठिकाणी जाणेच अशक्य आहे. तेथील काम रखडले आहे. लवकरच १०० टक्के काम पूर्ण होईल, असा विश्वास आहे.
- राजकुमार म्हेत्रे,
उपकार्यकारी अभियंता