कोल्हापूर : ‘राष्ट्रवादी’चे खासदार धनंजय महाडिक आजपासून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाच्या भाजप उमेदवाराच्या प्रचारात उघडपणे सक्रिय झाले. या मतदारसंघातून धनंजय यांचे चुलत भाऊ अमल महाडिक हे भाजपतर्फे निवडणूक लढवीत आहेत. अमल यांच्या प्रचारासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) संचालक व कर्मचाऱ्यांची बैठक दुपारी विकासवाडी (ता. करवीर) येथील ‘बीमॅट’ या महाडिक यांच्याच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झाली. या बैठकीस ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण नरके, विश्वास नारायण पाटील, रणजित पाटील, अरुण डोंगळे व रवींद्र आपटे यांच्यासह सुमारे दोनशेंहून अधिक कर्मचारी उपस्थित होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत आपली मदत झाल्याचे काँग्रेस उमेदवार सतेज पाटील यांच्याकडून सांगितले जाते; परंतु वस्तुस्थिती तशी नाही. ‘दक्षिण’मधील माझे मताधिक्य वाढायला हवे होते; परंतु तसे घडलेले नाही. या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चांगले प्रयत्न केले, याकडे दुर्लक्ष करता येत नाही.’
कोल्हापुरात राष्ट्रवादीचे खासदार भाजपच्या प्रचारात
By admin | Updated: October 2, 2014 23:30 IST