प्रत्यक्षात आता सरपंच निवडीच्यावेळी बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार असल्याने सर्वच पक्ष, पार्टीचे गाव पुढारी दक्ष झाले आहेत.
नाझरे ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत १५ पैकी १२ जागा शेकाप पुरस्कृत संजीवा ग्रामविकास आघाडीने जिंकल्या होत्या तर शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नाझरा महाविकास आघाडीला अवघ्या तीन जागा मिळाल्या होत्या. मात्र आरक्षण सोडतीत नाझरे गाव अनुसूचित जाती महिला सरपंच पद जाहीर होताच शेकापक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे चेहरे पडल्याने चांगलाच हिरमोड झाला. शेकापच्या निवडून आलेल्या १२ सदस्यांमध्ये एकही अनुसूचित जाती महिला सदस्य नसल्याने हातातोंडाशी आलेला घास शिवसेनेने हिसकावून घेतला आहे. दरम्यान आता प्रभाग क्रमांक ४ मधून शिवसेना पुरस्कृत नाझरा महाविकास आघाडीकडून अनुसूचित जातीच्या दोन महिला व एक पुरुष निवडून आल्यामुळे व आरक्षण सोडत अनुसूचित जाती महिलांसाठी पडल्यामुळे शिवसेनेच्या दोन्हीही महिला सरपंच होण्याचा बहुमान मिळणार आहे. तब्बल वीस वर्षानंतर या समाजाला न्याय मिळाल्याने आनंदाचे वातावरण आहे.
मानेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत ९ पैकी प्रभाग क्रमांक ३ मधून २ महिला बिनविरोध झाल्या होत्या. तर ७ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत शेकाप-शिवसेना आघाडीला ५ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २ जागा मिळाल्या होत्या. यामध्ये प्रभाग क्रमांक दोनमध्ये राष्ट्रवादीकडून एका जागेवर ओबीसी महिला व सर्वसाधारण महिला निवडून आल्या आहेत. आरक्षण सोडतीत मानेगाव नामाप्र महिलेसाठी जाहीर झाल्याने सरपंच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा होणार आहे. त्यामुळे नाराज झालेल्या शेकापक्ष- शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आरक्षणाविषयी शंका उपस्थित करून तहसीलदार अभिजित पाटील यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला आहे.
कडलास ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शेकाप-भाजप यांच्या ग्रामविकास आघाडीला ९ जागा तर सुनील पवार व सुनील पाटील, दत्ता टापरे, सयाजी गायकवाड विजय बाबर यांच्या परिवर्तन आघाडीला ८ जागा मिळाल्या होत्या. आरक्षण सोडतीत कडलास अनुसूचित जातीसाठी सरपंचपद आरक्षण जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामविकास आघाडीला चांगलाच दणका बसला आहे. याठिकाणी बहुमत ग्राम विकास आघाडीचे असताना प्रभाग क्रमांक ४ मधून अनुसूचित पुरुष व प्रभाग क्रमांक ३ मधून अनुसूचित महिला दोन्ही सदस्य परिवर्तन विकास आघाडीकडून निवडून आल्याने शिवसेनेला सरपंचपदाचा मान मिळणार आहे.