पंढरपूर : सांगली जिल्ह्यातून पंढरपूरमध्ये भेसळयुक्त दूध घेऊन येणारे वाहन पकडून १८८० लिटर दूध नष्ट केले. अन्न व औषध प्रशासनाने या दुधात होणारी पावडर आणि तेलाची भेसळ उघडकीस आणली असून, साबरकांथा मिल्क प्रोड्युसरला व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सांगली जिल्ह्यातून निळ्या रंगाच्या वाहनातून (एम. एच. ०९ सी. यू. ०००७) भेसळयुक्त दूध पंढरपूर येथे येत असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांना मिळाली होती. या गोपनीय माहितीनुसार साबरकांथा को-ऑप. मिल्क प्रोड्युसर या पेढीची तपासणी केली. या पेढीत भेसळीचे दूध स्वीकारत असल्याचे दिसून आले. पेढीत अंदाजे १०० लिटर व टेम्पोत संशयित भेसळीचे अंदाजे १८८० लिटर दूध आढळून आले. यामुळे संशयित भेसळीच्या दोन्ही दुधाचे नमुने विश्लेषणाकरिता घेण्यात आले. त्यानतंर उर्वरित साठा जागेवर नष्ट करण्यात आला. साबरकांथा पेढीत अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार आवश्यक तंत्रज्ञ नसल्याचे आणि पेढी विनापरवाना असल्याचे दिसून आले. पेढीस जागेवर व्यवसाय थांबविण्याचे आदेश देण्यात आले.
अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रदीपकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर, सहकारी अन्न सुरक्षा अधिकरी योगेश देशमुख यांनी ही कारवाई केली.
सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा कायद्याचे तंतोतंत पालन करूनच व्यवसाय करावा, अन्यथा अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाईची पावले उचलली जातील, असे आवाहन पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी केले आहे.
----
फोटो : ०३ मिल्क
अन्न व औषध प्रशासनाने पंढरपुरात येणारा भेसळयुक्त दूध साठा पकडून तो नष्ट केला.