सोलापूर : लोकसभा निवडणुकीतील दोन्ही उमेदवारांचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून एप्रिलअखेर अन् मेच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय नेत्यांकडून सोलापुरात मोठ्या सभांचा धडाका लागणार आहे. यात महाविकास आघाडी अन् महायुतीमधील मित्र पक्षांच्या नेत्यांची देखील हजेरी लागणार आहे.
काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सोलापुरात प्रियांका गांधी यांची सभा होणार आहे. यासोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. शिवकुमार यांच्यादेखील सोलापुरात सभा होणार आहेत. बुधवार, १ मे रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तर गुरुवार, २ मे रोजी शरद पवार यांची सोलापुरात सभा होणार आहे. यासोबत कन्हैयाकुमार, अखिल भारतीय काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष खासदार इम्रान प्रतापगढी यांचीदेखील सोलापुरात सभा होणार आहे. पुढील दोन दिवसांत प्रियंका गांधी यांच्याकडून सभेची तारीख मिळणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिली.
मोदींची क्लस्टर सभाभाजपकडून नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, स्मृती इराणी, देवेंद्र फडणवीस, बावनकुळे यांच्या सोलापुरात सभा होणार आहेत. सोलापूर, माढा तसेच सांगली या तिन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी मोदींची एकत्रित क्लस्टर सभा होण्याची शक्यता आहे.