शहाजी फुरडे-पाटील बार्शी : मनुष्याच्या जीवनात जन्मल्यापासून ते मरेपर्यंत अनेक प्रकारचे संस्कार केले जातात़त्यामध्ये लग्नसंस्कार हा देखील आयुष्याच्या टप्प्यावरील महत्वाचा संस्कार आहे़ आजवर वेगवेगळ्या ठिकाणी लग्न झालेली आपण पाहिली असतील मात्र भगवंताचे अधिष्ठान असलेल्या बार्शी शहरात चक्क स्मशानभूमीमध्ये (मोक्षधाम ) प्रतिष्ठीत मान्यवरांच्या उपस्थितीत प्रसन्नदाता गणेश मंदीर ट्रस्टच्या सहकार्याने अनोखा विवाह सोहळा पार पडला़ बार्शी शहरात धसपिंपळगाव रोडवर बार्शी नगरपालिकेची स्मशानभूमी आहे़ मागील दहा ते पंधरा वर्षापुर्वी या भागात लहान मुले किंवा नागरिक देखील जायला भित असत,मात्र मागील सहा वर्षापुर्वी बार्शीतील प्रसन्नदाता गणेश मंदीर ट्रस्टच्या वतीने ही स्मशानभूमी विकसीत करण्यासाठी घेतली़ त्यानंतर या स्मशानभूमीचे रुपच पालटले गेले आहे़ सुमारे एक हजाराच्या जवळपास लावलेली हिरवी झाडे, अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांना बसण्यासाठी भव्य असे स्टेडियम, सहा दहनशेड, लाईट व्यस्था, न्हावी कट्टा, आ़ दिलीप सोपल यांच्या निधीतून अंतर्गत डांबरी रस्ते, संरक्षक भिंत, लॉन आदी सुविधा अध्यक्ष कमलेश मेहता यांनी केलेल्या आहेत़ बार्शीच नव्हे तर कोणत्याही स्मशानभूमीत माणूस हा आनंदाने जात नाही, कारण माणसावरील अंतिम संस्कारासाठी जड अंतकरणाने व पावलावे तो तिकडे जात असतो, त्याठिकाणी जाणाऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हे तर मोठे दु:ख असते़ त्यामुळे स्मशानात लग्न ही कल्पनाच मनाला रुचत नाही मात्र हे बार्शीत आज प्रत्यक्षात घडले आहे़ स्मशानभूमीमध्ये उभारलेल्या या सुविधांची निगा राखण्यासाठी बार्शी व परिसरातील कोण रहाण्यास तयार नव्हते त्यामुळे प्रसन्नदाता ट्रस्टने नांदेड येथून स्मशान जोगी कुटुंबाला बार्शीत आणले़ मागील कांही वर्षापासून लक्ष्मण धनसरवाडकर हे कुटुंब लहान मुला-बाळांसह याठिकाणी रहात आहे़ लक्ष्मण यांचे बंधू अंकुश घनसरवाडकर रा़ हदगाव जि़ नांदेड यांचा शुभविवाह छाया गंगाधर गंधेवाड रा़ हदगाव जि़ नांदेड यांच्याबरोबर ठरला व त्या कुटुंबाच्या आग्रहाखातर हा सोहळा आज दुपारी मोक्षधाममधील मुक्तेश्वर मुर्तीसमोर टाकलेल्या मांडवात मंगलअष्टकांसह संपन्न झाला़या अनोख्या विवाह सोहळ्यांची बार्शी व परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे़ यावेळी वधुवरांना शुभार्शिवाद देण्यासाठी आ़ दिलीप सोपल, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, मुख्याधिकारी त्रिंबक ढेंगळे-पाटील,डॉ़ संजय अंधारे , प्रा़डॉ़ भारती रेवडकर,पो़नि़ गजेंद्र मनसावाले, मल्लीनाथ गाढवे, भगवंत देवस्थानचे दादा बुडुख, मातृभूमीचे सचिव प्रतापराव जगदाळे, मंडळाचे अध्यक्ष कमलेश मेहता,बंडू माने, बसवराज गाडवे, पाणीपुरवठा सभापती काकासाहेब फुरडे-पाटील, नगरसेवक नागेश अक्कलकोटे, विजय चव्हाण, पाचू उघडे, प्रशांत कथले, पृथ्वीराज रजपूत, भैय्या बारंगुळे, बापू जाधव, शिवशक्ती बँकेचे संचालक मुरलीधर चव्हाण, प्रदीप बागमार,विक्रांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते़ प्रास्ताविक राजाभाऊ काकडे यांनी केले़ यावेळी कमलेश मेहता यांनीही विचार व्यक्त केले़ विवाह सोहळ्यासाठी प्रसन्नदाता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले़
बार्शीत पार पडला चक्क स्मशनभूमीत विवाह सोहळा
By admin | Updated: May 29, 2017 15:02 IST