लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शी (जि. सोलापूर) : बार्शी शहर व तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात तब्बल २६ जणांनी आत्महत्या केल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली. सावकाराचे कर्ज, दीर्घ आजार, व्यसनाधीनता ही याची प्रमुख कारणे आहेत. ग्रामीणमध्ये महिला तर शहरात युवकांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
बार्शी शहर, तालुका, वैराग, पांगरी या चार पोलीस ठाण्यात नोव्हेंबर महिन्यात तब्बल २६ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक ११ आत्महत्येची नोंद ही बार्शी शहरात झाली आहे. वैराग हद्दीत ७, पांगरीमध्ये ३ आणि तालुका पोलीस स्टेशनमध्ये ५ अशा एकूण २६ आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये प्राधान्याने गळफास घेऊन, विषप्राशन करून व विहिरीत उडी मारून केलेल्या आत्महत्यांचा समावेश आहे. यातील तीन आर्थिक अडचणींमुळे, दोन दीर्घ आजाराला कंटाळून, पाच व्यसनाधीनतेमुळे व पाच आत्महत्या या सावकाराच्या कर्जाला कंटाळून झाल्या आहेत; मात्र त्याची तशी पोलीस स्टेशनला नोंद नाही. या २६ जणांमध्ये १० महिला तर १६ पुरुषांचा समावेश आहे. यातील १० जण हे २० ते ४० वर्षे वयोगटातील आहेत.