पक्षावर की गटावर प्रश्नचिन्ह कायम
माळशिरस : मागील न.प. च्या पहिल्याच निवडणुकीत तुकाराम देशमुख व पांडुरंग वाघमोडे गटाचे ५ , संजीवनी पाटील गटाचे ५ , मिलिंद कुलकर्णी व आप्पासाहेब देशमुख गटाचे ४ अपक्ष ३ असे बलाबल होते. यात संजीवनी पाटील व मिलिंद कुलकर्णी, आप्पासाहेब देशमुख या दोन्ही गटांची युती झाली. या दोन्ही गटांकडे मध्यंतरी काही महिने वगळता नगराध्यक्ष पदाची खुर्ची कायम राहिली. लोकसभा व विधानसभेवेळी झालेल्या नेतेमंडळींच्या पक्ष अदलाबदलीमुळे यावेळी होणारी निवडणूक पक्षावर करण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी पक्षांचे नेते प्रयत्नशील आहेत. मात्र, अंतर्गत मतभेदांमुळे सध्या तरी माळशिरसच्या नेतेमंडळींनी गटांवर निवडणुकीची तयारी ठेवली आहे. त्यामुळे यावेळी होणारी निवडणूक पक्षीय चिन्हावर होणार की स्थानिक गटांच्या नावावर लढविली जाणार याकडे सध्या तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.