मी नेहमी माझा वैद्यकीय व्यवसाय करताना रुग्णाबरोबर सुसंवाद करीत असतो तसेच व्यवसायाचा वेळ सांभाळून उरलेल्या वेळेत निसर्गात रमून जातो. निसर्गाने आणि माझ्या व्यवसायातील अनेक अनुभवांनी मला एक उत्तम माणूस म्हणून आयुष्य जगायचं असं बरंच काही शिकवलं आहे. त्यापैकी मला मिळालेली एक शिकवण ‘खरंच आपणास जगण्यासाठी फार कमी लागतं’... आपणासमोर व्यक्त करीत आहे. सध्याच्या काळात भौतिक सुखाकडे वाटचाल करताना माणसाची केविलवाणी धडपड पाहून पाहिल्यानंतर मला असे वाटते की ही धडपड केवळ पुढील पिढ्यासाठी पुंजीची व्यवस्था आणि स्वत: समाजामध्ये एक वेगळी प्रतिमा निर्माण करणे एवढीच आहे.
‘जगायला खरंच कमी लागतं’ याचा मला अनुभव अनेकवेळा अनेक प्रसंगातून मिळत असतो. त्यातील फक्त दोन उदाहरणे आपणासमोर मांडतो. साल २००२ मध्ये मी रोटरीच्या पोलिओ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी आफ्रिकेतील लेसोथो या देशात गेलो होतो. नेहमीप्रमाणे रुग्णांची तपासणी करताना त्यांच्याशी सुसंवाद केला आणि एक कुतूहल म्हणून लांब रांगेत उभ्या असलेल्या रुग्णांची मी चौकशी करीत होतो.
मी त्यांना फक्त एकच प्रश्न विचारत होतो ‘तुम्ही इथे का आणि कशासाठी आलात?’ मला अपेक्षित असलेलं उत्तर तर मिळालाच नाही पण मला मिळालेलं उत्तर ऐकून माझं मन सुन्न झालं. रांगेत उभे असलेल्या जवळजवळ चाळीस टक्के रुग्णांनी उत्तर दिलं की, ‘येथे आम्ही ही मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी आलोय कारण शस्त्रक्रिया झाल्यास आम्हाला सात दिवसाचं मोफत जेवण मिळणार आहे आणि हे जेवण मिळावं म्हणून येथे आलोय. ‘हे उत्तर मानवी जीवनाबद्दल सर्वकाही सांगून जातं.
या पृथ्वीतलावर अनेक अशी माणसं आहेत. ज्यांना दोनवेळचे जेवण सुद्धा मिळत नाही. मग मनात प्रश्न येतो की, खरंच हल्ली प्रत्येक मनुष्य प्रचंड धडपड करून अपेक्षेपेक्षा जास्त संपत्ती मिळविण्याचा प्रयत्न का करतात? प्रचंड संपत्ती संपादन करूनही तो निरोगी राहण्यासाठी डाएटिंग (कमी जेवतो) करतो.
माझा दुसरा अनुभव जो मला निसर्गातून नेहमीच मिळतो. वन्यजीवनात राहणारे सर्व पक्षी आणि प्राणी हे दररोज स्वत:ला लागणारे तेवढेच अन्न खातात. ते कधीही वर्षभराचा अन्नाचा साठा करून आयुष्य काढत नाहीत. त्यांचं अन्न खाताना ती निसर्गाची की कधीही नासधूस करीत नाही. ते निसर्गातील परिस्थितीत समतोल राखतात आणि मानव आपल्या अन्नाव्यतिरिक्त गरजा मिळविण्यासाठी निसर्गातील परिसंस्थेत असमतोल निर्माण करीत आहेत.
एक डॉक्टर म्हणून मी सांगू शकतो की देवानं दिलेलं आपलं सुंदर शरीर आणि त्यातील सर्व अवयव पाहता आपल्या जठराचा आकार आपण बंद केलेल्या मुठ्ठी एवढाच असतो याचाच अर्थ असा की आपणास निरोगी आणि सुंदर आयुष्य जगण्यासाठी दोनवेळच्या मूठभर अन्नाची गरज आहे.
मी या दोन्ही उदाहरणावरून चांगलं आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी आपणास खरंच फार कमी अन्न आणि गरजा लागतात असा अर्थ काढतो. हे अन्न आणि गरज नसलेल्या गरजा मिळविण्यासाठी मानव वर्तमान काळात आनंदी आणि शांततामय जगण्याचं विसरून गेला आहे. - डॉ. व्यंकटेश मेतन(लेखक अस्थिरोगतज्ज्ञ आहेत़)