पंढरपूर (जि. सोलापूर) : येथील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गोमुख कुंडात लघुशंका करून उपासना स्थान अपवित्र करणा-या गोपाळ बडवे यास न्यायदंडाधिका-यांनी सुनावलेली शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी अपिलात कायम ठेवली.१५ मे २००३ रोजी पहाटे सव्वाएकच्या सुमारास गोपाळ बडवे हा गोमुख कुंडात लघुशंका करीत असल्याचे ड्युटीवरील कर्मचारी आणि सुरक्षा अधिकाºयांनी पाहिले. बडवे याच्या कृत्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपी बडवेवर भादंवि कलम २९५ अन्वये गुन्हा दाखल झाला. न्यायदंडाधिकाºयांसमोर हा खटला चालला. बडवे याने केलेला गुन्हा सिद्ध झाल्याने त्यास ३ महिन्यांची साधी कैद, १ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. ५ जून २०१० रोजी झालेल्या या शिक्षेविरुद्ध बडवे याने सत्र न्यायालयात अपील केले.मंदिर समिती आणि पुजाºयांमध्ये वाद आहे. या वादातूनच गोपाळ बडवे याला गुंतविण्यात आले आहे. त्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात यावी, असा युक्तिवाद बडवे यांच्या वकिलांनी केला. न्यायालयाने तो युक्तिवाद अमान्य केला. यात सरकारतर्फे अॅड. सारंग वांगीकर यांनी काम पाहिले.न्यायदंडाधिकाºयांनी दिलेला निकाल योग्यचगोपाळ बडवे हा लघुशंका करीत असल्याचा प्रकार पुंडलिक सीताराम जाधव, औदुंबर मारुती डोंगरे, बाळासाहेब नामदेव माळी, माणिक दशरथ यादव यांनी पाहिला आहे. त्यानंतर त्यांनी सुरक्षारक्षक मोरे, डोंगरे आणि सरवदे यांना बोलावून घेतले आणि बडवेचा प्रकार दाखवून दिला. शिवाय विठ्ठलाच्या अभिषेकाचे पाणी (तीर्थ) गोमुखाद्वारे कुंडात येते. हे पाणी भाविक तीर्थ म्हणून प्राशन करतात. गोमुख कुंड अत्यंत पवित्र समजले जाते. आरोपीच्या या कृत्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे न्यायदंडाधिकाºयांनी दिलेली शिक्षा योग्यच असल्याचे सत्र न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे.
गोमुख कुंडात लघुशंका केल्याचे प्रकरण, गोपाळ बडवेची शिक्षा अपिलात कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 03:28 IST