महेश कुलकर्णी
हावरटवाडीचा हणम्या आज भलताच खुश होता. आनंदाने शिळ मारत घरातून बाहेर पडला. रस्त्यात पारावर नेहमीप्रमाणे तात्या ऊन खात बसले होते.
हणम्याला पाहून तात्यांनी आवाज दिला, अरे हणमा... कुठं निघाला... अन् काय आज लईच खुशीत हायंस... काय इशेष...हणम्या आनंदातच म्हणाला... तात्या, आपले सगळे प्रॉब्लेम सॉल होणार... तात्या - कसं काय रं बाबा...हणम्या - अहो, सरकारने संकल्पपत्र का काय ते जाहीर केलं आहे मनं... त्यात पाच वर्षात एक कोटी नोकºया देणार असल्याचं सांगितलं आहे. आता पारावर चकाट्या पिटत बसायची वेळ येणार नाही म्हणून मी बी लई खुश आहे...तात्या - अरं लेका, लई झ्याक झालं की...हणम्या : आता जातो शहराला... रोजगारबी मिळंल... अन् पोट भरण्यासाठी दहा रुपयात ‘ताट’ बी आहेच की!तात्या : जा बाबा... लई भारी होईल... आपल्या गावातली बाकी पोरंबी हळूहळू न्हे.(काही दिवसांनी हणम्या शहराच्या ठिकाणी नोकरी मागायला गेला)
ठेवणीतील संदुक (पेटी) घेऊन हणम्या शहरात पोहोचला. मुंबईच्या ‘वाघा’नं दहा रुपयात जेवण देणार असं जाहीरनाम्यात सांगितलं होतं... हे हणम्याला ठाऊक होतं. दहा रुपयात जेवण करण्यासाठी तो निघाला.. एका हॉटेलमध्ये आला... मालकाला म्हणाला, मालक सरकारनं दहा रुपयात जेवण देणार असं सांगितलं होतं, ते द्या की! वेटर थोड्या वेळाने ताट घेऊन आला... रिकामंच ताट.. हणम्याने विचारले हे काय?, वेटर म्हणाला, दहा रुपयात नुसतं ताटच मिळतंय... जेवायला वेगळे पैसे द्यावे लागतील!
उत्तर ऐकून हणम्या जाहीरनाम्याच्या नावावर कटाकटा बोटं मोडत तिथून उठला, तडक निघाला रोजगार शोधायला. रस्त्यात एका कारखान्यावर पोहोचला... तिथं जाऊन ‘सरकारने रोजगार देणार म्हणून आम्हास्नी सांगितलं होतं... काही काम हाय कां? असे आॅफिसमध्ये काम करणाºयाला विचारले... अधिकारी म्हणाला, अहो आर्थिक मंदीमुळे अर्धे कामगार आम्ही कपात केले आहेत. तुम्हाला कुठून काम द्यायचे? दुसºया ठिकाणी गेला तिथंबी कामगार कपातच सुरू होती. त्यानंबी तेच सांगितलं.... आता मात्र हणम्याला घामच फुटला... दहा रुपयात ‘ताट’बी नाही रोजगारबी नाही... हे संकलपत्र म्हणजे काय प्रकार आहे, त्याच्या लक्षात आले. आता सरळ आपले गाव गाठलेले बरे म्हणून त्याने गावाकडे जाणारी गाडी धरली.
गावात पोहोचल्यावर हणम्या दुसºया दिवशी पुन्हा पारावर आला. तंबाखूचा बार चोळत तात्या बसले होते. ऐंशी वर्षांच्या तात्याच्या चेहºयावर निर्विकार भाव होते. जणू त्यांना हणम्याचं जाणं आणि लगेच माघारी येणं आधीच माहीत होतं... तात्याने विचारले, काय झाला हणमा ? माघारी का आलास...
हणम्या म्हणाला, तात्या! काय हो, ते सरकार आणि काय तो जाहीरनामा, वचननामा अन् संकल्पपत्र... काम मागायला गेलो तर मंदी हाये म्हणत्यात... जेवण मागायला गेलो... तर दहा रुपयात येत नाही म्हणत्यात...! हे सगळं नको गड्या आपला गाव बरा, म्हणून गावाकडे आलो अन् थेट गेलो शेतात.. आपलं शेतीचं कामच लई भारी म्हणून गेलो तर काय लाईटच नाही... मायबाप सरकार, बारा तास शेतीला लाईट देतो म्हणलं पण तेबी न्हाई... आता पुन्हा पारावर बसायची येळ आलीय बघा!
तात्या म्हणाले : अरे, हणम्या, गेल्या साठ वर्षांपासून मी हेच पाहतोय. निवडणुकीत बोलल्यालं आजपर्यंत कधी खरं झालं नाही... आस्वासन द्यायचं अन् ते खरं व्हायचं नाही, ही बघायची मलाबी सवय झाली, पण यावेळी म्हनं कोणाला तरी ‘भारतरत्न’ द्यायचंबी आस्वासन दिलंय... हे मात्र लईच झालंय गड्या !