कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी मंत्रिमंडळाने शिफारस केली आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांना पत्र पाठवून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ स्थापन व्हावे, या मागणीसाठी गेली २८ वर्षे संघटितपणे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे शासनाने ‘सर्किट बेंच’ स्थापन करण्याचा ठराव मंजूर केला आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी बुधवारी जिल्हा बार असोसिएशनच्या हॉलमध्ये समितीचे निमंत्रक अॅड. राजेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत ‘सर्किट बेंच’चा ठराव केल्याबद्दल यावेळी मंत्रिमंडळाच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र व गोवाचे सदस्य शिवाजीराव चव्हाण यांनी कृती समितीने आंदोलनाबाबत कोणताही निर्णय तूर्त न घेता मुख्य न्यायाधीशांना पत्र देऊन निर्णयाबाबत विचारणा करावी, असे सूचविले. त्यानुसार मुख्य न्यायाधीश शहा यांना त्वरीत पत्र पाठविण्याचा ठराव करण्यात आला.दरम्यान, अॅड. प्रशांत चिटणीस, संभाजीराव मोहिते (कराड), दिलीप नार्वेकर (सिंधुदुर्ग), किरण घाटगे (पंढरपूर), जी. एम. पाटील, बाळासाहेब शेळके, (माळशिरस) आदींनी सर्किट बेंच स्थापनेसाठी आम्ही ठामपणे कोल्हापूरचे बाजूने असल्याचे सांगितले. यावेळी के. ए. कापसे, शिवाजीराव राणे, विवेक घाटगे, पी. आर. पाटील, प्रकाश मोरे (कोल्हापूर), डी. व्ही. पाटील (सातारा), श्रीकांत जाधव (सांगली), महादेवराव आडगुळे यांची भाषणे झाली. यावेळी हेमेंद्र गोवेकर (मालवण), विलास मगदूम (कागल), जयसिंगराव पाटील (माळशिरस), वीरेश नाईक (सिंधुदुर्ग), सुभाष देसाई (पंढरपूर), शशिकिरण पाटणे (सांगोला), महेंद्र कोरे (मिरज), डी. सी. जाधव (मंगळवेढा), शरद जाधव (सांगली), अजित मोहिते, धनंजय पठाडे, संपतराव पवार, पी. बी. आंबेकर, अतुल रेंदाळे (इचलकरंजी) आदींसह कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.
मुख्य न्यायाधीशांना पत्र पाठविण्याचा निर्णय
By admin | Updated: May 21, 2015 00:44 IST