सोलापूर : अक्कलकोट रोडवरील सेंट्रल बँकेची शाखा फोडून चोरट्याने आत प्रवेश केला असला तरी लोखंडी तिजोरीतील एक पैकाही हाती लागला नाही. त्यामुळे आतील २६ लाखांची रोकड सुस्थितीत राहिली; मात्र दोन संगणक पळवण्यात चोरटा यशस्वी ठरला. मंगळवारी पहाटे तीन ते पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. जोडबसवण्णा चौक ते पाण्याची टाकी या मार्गावरील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बँकेची शाखा आहे. इमारतीलगत असलेल्या एका पत्र्याच्या शेडवरून चोरटा दुसऱ्या मजल्यावर गेला. खिडकीचा एक गज कापून तो बँकेत शिरला. आत शिरताच त्याने आधी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे कनेक्शन तोडून टाकले. ज्या खोलीत तिजोरी ठेवण्यात आली होती, त्या खोलीचा दरवाजा तोडला खरा; मात्र आतून लोखंडी दरवाजा असल्याने तो मात्र त्याला तोडता आला नाही. दरवाजाच्या वर बसवण्यात आलेला एक्झिट फॅन तोडून त्यातून त्याने आत प्रवेश मिळवला. लोखंडी कटावणी आणि इतर धारदार हत्याराने त्याने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात तो अयशस्वी ठरला. दरम्यान, हाती काहीच लागत नसल्याने दोन कॅश काऊंटरमधील संगणक घेऊन तो पळून गेला. बँकेची साफसफाई करण्यासाठी आलेला शिपाई महांतेश कोळी याने बँक उघडल्यानंतर त्याला प्रकार दिसला. त्याने तातडीने बँकेचे शाखाधिकारी सुरेश देशपांडे यांना भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली. घटनेचे वृत्त समजताच पोलीस उपायुक्त नीलेश अष्टेकर, सहायक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, जेलरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एफ. आय. काझी, दुय्यम पोलीस निरीक्षक काणे, सहायक पोलीस निरीक्षक देवकर आदींनी भेट देऊन पाहणी केली. सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद आवटे आणि पोलीस कॉन्स्टेबल दीपक जाधव यांनी ठिकठिकाणचे फिंगर प्रिंट घेतले.------------------------------चोरट्याने बँकेतील दूरध्वनी, सीसीटीव्ही, संगणक आदींच्या वायरी तोडून टाकल्या. त्यामुळे बँकेचे दैनंदिन कामकाज ठप्प झाले. बँकेत येणाऱ्या ग्राहकांना बँक बंद असल्याचे सांगण्यात येत होते. दिवसभरात बँकेची १५ ते २० लाखांची उलाढाल ठप्प झाली. ----------------------आंतरराज्य टोळीवर संशयतिजोरीच्या खोलीत असलेला एक्झिट फॅन तोडून चोरट्याने केवळ ८ बाय ८ इंच इतक्या चौकटीतून आत प्रवेश मिळवला. एखादा लहान मुलगाही त्यातून आत जाऊ शकत नाही; मात्र तो चोरटा तेवढ्या फटीतून आत गेलाच कसा ? याची चर्चा बँकेत होती. यावरून आंतरराज्य टोळीतील एखाद्या चोरट्याचेच हे कृत्य असण्याची शंका काही पोलिसांनी व्यक्त केली. ------------------------------बँकेची सीसीटीव्ही यंत्रणा कुचकामीबँकेत बसवण्यात आलेल्या चार कॅमेऱ्यांमधून फुटेज घेण्यात आले; मात्र त्यात काहीच दिसले नाही. सीसीटीव्ही कॅमेरे प्रभावी असते तर कदाचित चोरट्याचे वर्णन समजले असते. बँकेसमोर असलेले आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आणि जवळच बोल्ली टायर्सचे दुकान आहे. या दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत; मात्र दर्शनी भागात कॅमेरे बसवले असते तर चोरटा या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असता.
सेंट्रल बँक फोडली : दोन संगणक पळविले; सायरन, सीसीटीव्हीच्या वायरी तोडल्या
By admin | Updated: September 3, 2014 01:03 IST