इलेक्शनसाठी माकपचा ताफा तय्यार !आॅनलाईन लोकमत सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचा फिवर हळूहळू वाढू लागला आहे. पक्षांतर्गत रुसवे-फुगवे, कोणाला तिकीट द्यायचे, कोणाला नाकारायचे याबद्दल खल होताहेत. नामनिर्देशनपत्र सादर होण्यापूर्वी साऱ्या बंडोबांना थंड करण्याचे काम सुरु आहे. तिसरी आघाडी बनविण्यासाठीच्या घडामोडींनाही वेग आला आहे. त्याला अंतिम स्वरुप अद्याप आलेले नाही. दरम्यान, माकपने मात्र झाली आघाडी तर ठीकच, नाही तर एकला चलो रे म्हणत निवडणुकीसाठी आपली यंत्रणा तयार केली असून, खास हैदराबादहून प्रचाराचे साहित्य आणून ठेवले आहेत. पूर्व भागात माकपचा विशिष्ट पट्टा प्राबल्यवान समजला जातो. त्या ठिकाणी आपलेच उमेदवार निवडून आले पाहिजेत या दृष्टीने माकपचे राज्य सचिव, माजी आमदार आडम मास्तर यांनी आपला पूर्ण वेळ कार्यकर्त्यांसह प्रभागातील विद्यमान नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना देऊन झाडून कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. सध्या प्रभागात मतदार यादी तपासणी, विभागणी, दुरुस्तीची कामे सुरु आहेत. यंदाच्या निवडणुकीसाठी ९, १३, १४, १६, १७, १८ या प्रभागांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पार्टीच्या वतीने विविध प्रभागांतून कार्यकर्त्यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा पाहून ५० जणांची यादी तयार केली आहे. यातून सहा प्रभागांसाठी २४ जणांची अंतिम निवड करण्याचे काम सुरु आहे.दाट लोकवस्ती असलेले दत्तनगर येथील पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदारांच्या गर्दीने गजबजू लागले आहे. एस.एफ.आय. युवा आघाडी, महिला आघाडीनेही नियोजनाप्रमाणे यंत्रणा चालविल्याचे चित्र दिसू लागले आहे. -----------------------------चर्चेतली नावेया निवडणुकीसाठी निवडलेल्या ५० जणांपैकी व्यंकटेश कोंगारी, सुनंदा बल्ला, बाळासाहेब तेलंग, अरुणा आडम (प्रभाग ९), कॉ. मुरलीधर सुंचू, कॉ. भालचंद्र म्हेत्रे (प्रभाग १३), कॉ. युसूफ शेख (मेजर), कॉ. मेहबूब हिरापुरे (प्रभाग १४), कॉ. शंकर म्हेत्रे (प्रभाग १६), कॉ. आकिब शेख (प्रभाग १७), कॉ. नलिनी कलबुर्गी (प्रभाग १८) यांची नावे चर्चेत आहेत. -------------------------प्रचाराची साधने हजरमतदारांपुढे जाताना पक्षाच्या यंत्रणेकडून नियोजनबद्ध कार्यक्रम आखला असून, हैदराबादहून १० हजार झेंडे, १० हजार टोपी, टी शर्ट, बिल्ले, पक्षाचे प्रतीक असणाऱ्या साधनांची उपलब्धता झाली आहे. आवश्यकतेनुसार आणखी यात वाढ होणार आहे. बदलत्या काळानुसार माहिती तंत्राचाही अवलंब यात केला जाणार आहे. वायफाय यंत्रणेबरोबर सोशल मीडियाचाही वापर करण्यात येणार असल्याचे पक्षाचे प्रसिद्धीप्रमुख अनिल वासन यांनी स्पष्ट केले. ---------------------मार्क्सवादी पक्षाची स्थापना सोलापुरात १९६४ साली झाली. यामध्ये कॉ. नारायणराव आडम, शिवय्या कोटा, व्यंकटेश सुरा, लिंगय्या तडका, हणमंतू साखरे, बलपुरे, रायेशम सामलेटी, मल्लेशम येमूल, नरसप्पा गडगी, हिमामसाब मुल्ला, हेमण्णा केंचगुंडी हे संस्थापकीय सदस्य आहेत. बौद्धिक विकासासाठी त्याकाळी कॉ. नारायणराव आडम ‘जीवनमार्ग’ मुखपत्राच्या माध्यमातून प्रबोधनाचे काम करीत असत.
इलेक्शनसाठी माकपचा ताफा तय्यार !
By admin | Updated: January 25, 2017 18:39 IST