केम गणातील विजयी उमेदवारच होणार सभापतीकंदर: करमाळा पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जाती वर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे केम पंचायत समिती गणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या गणात चौरंगी लढत लागण्याची शक्यता असून यातून निवडून येणारा भावी उमेदवार भावी सभापती असणार आहे. केम गणात जयवंतराव जगताप आणि कै. दिगंबरराव बागल यांच्यातच या गणात निवडणूक लढवली जात होती. परंतु आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आमदार नारायण पाटील, रश्मी बागल, विठ्ठल शुगरचे चेअरमन संजय शिंदे, जयवंतराव जगताप यांनी चुरस निर्माण करून आपले उमेदवार देण्याची तयारी केली आहे. केम गावची लोकसंख्या जास्त असल्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सूत्रे केम येथून हलली जात आहेत. कै. दिलीप तळेकर, कै. भगवान दोड हे गावच्या विकासासाठी एकमेकांच्या विरुद्ध निवडणूक लढवीत होते. आजही अजित तळेकर यांनी सरपंचपद भूषवून गावगाडा चालवत आहेत. जयवंत जगताप यांचे कट्टर समर्थक विष्णू पारखे विरोधक म्हणून काम करीत आहेत. रश्मी बागल यांनीही उमेदवार चाचपणीला सुरुवात केली आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून तरुण पिढी संजय शिंदे यांच्या संपर्कात आहे. कंदर याही गावात मतदान जास्त आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्थापनेपासून आजतागायत कंदरला उमेदवारी दिलेली नाही. राजकीय पुढाऱ्यांनी आतापर्यंत या गावचा वापर करून घेतला आहे. आतातरी आम्हाला उमेदवारी मिळणार का, असा सवाल विचारला जात आहे. या गावात चारही राजकीय पुढाऱ्यांना मानणारा मतदार आहे. मकाईचे माजी संचालक नानासाहेब लोकरे, अरुण सरडे हे बागल गटाकडून उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. संजय शिंदेंकडून नवनाथ भांगे तर नारायण पाटील यांच्याकडून नवनाथ शिंदे, गोपाळ मंगवडे आणि जयवंत जगताप यांच्याकडून अण्णा पवार प्रयत्न करीत आहेत. या गणात केम, सतोली, कवीटगाव, वडशिवणे, कंदर, पांगरे, भाळवणी अशी सात गावे आहेत. करमाळा तालुक्यातील दहा गणांपैकी केम पंचायत समिती गण हा अनुसूचित जाती आरक्षित असल्यामुळे या ठिकाणी सर्वच पक्ष राजकीय ताकद लावत आहेत. या गणातून निवडणूक लढविण्यासाठी इंद्रजित कदम, पिंटू भगत, मधुकर भगत, सुनील लोखंडे, शेखर गाडे, अनिल कांबळे, देविदास पोळके, विष्णू अवघडे, मदन अवघडे, विजय ओहोळ, मुनिराज पोळके, भालचंद्र गाडे आदी उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी तयारीत आहेत.
केम गणातील विजयी उमेदवारच होणार सभापती
By admin | Updated: January 24, 2017 20:06 IST