बार्शी : शहरात सध्या चोरून नळ कनेक्शन घेतल्याचे प्रकार उघड झाले आहेत. अशा अनधिकृत नळ कनेक्शनद्वारे पाणी घेणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, या शोधमोहिमेत आढळलेल्या नळ कनेक्शनधारकांपैकी ५० जणांनी नळ कनेेक्शन नियमित करून घेतले आहेत.
बार्शी शहरातील पाणीचोरी रोखण्यासाठी नळ कनेक्शन तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या तपासणीत अनधिकृत नळ कनेक्शनद्वारे पाणी वापरत असल्याचे आढळले आहे.
फौजदारी कारवाई टाळण्यासाठी अशांनी १५ दिवसांत कनेक्शन नियमित करण्यासाठी पालिकेच्या नळ कनेक्शन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २०१३ मधील ठरावानुसार नळ कनेक्शन नियमित करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या कारवाईत ५० बेकायदेशीर नळ कनेक्शन नियमित करून घेण्यात आली आहेत.