राजेंद्र हजारे- निपाणी -ऊस दराची अनिश्चितता, गत हंगामातील मिळणाऱ्या अंतिम बिलाला झालेला विलंब अशी परिस्थिती असतानादेखील राज्यात यंदाच्या हंगामातील उसाचे गाळप होणार आहे. कर्नाटकात यंदा उसाचे पीक चांगले असून, ४६ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.गतवेळच्या ऊस गळीत हंगामावेळी राज्यातील ६० साखर कारखान्यांनी ३८३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. एकूण ४२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा सुमारे ४५० लाख टन उसाचे उत्पादन आणि ४६ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित असल्याची माहिती साखर तज्ज्ञांनी दिली आहे.सन २०११-१२ सालच्या हंगामामध्ये राज्यात ५८, २०१२-१३ मध्ये ६० साखर कारखान्यांनी उसाचे गाळप केले होते. यावर्षी बिदर, बेळगाव आणि चामराजनगर जिल्ह्यांमधील नवीन कारखाने निर्माण झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात ६३ साखर कारखाने उसाचे गाळप करणार आहेत. कर्नाटक सरकारने गतवर्षीच्या उसाला प्रतिटन १५० रुपये प्रोत्साहन धन दिले होते. यंदा अद्याप दराची निश्चिती नसल्याने सरकार कोणती भूमिका घेणार याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहेत. कारखान्यांची वाढती संख्या, योग्य पाऊस, अनुकूल वातावरण व इतर कारणांमुळे राज्यातील उसाचे क्षेत्र ४.०४ लाख हेक्टरने वाढले आहे. साखर उत्पादनामध्ये राज्य देशामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटकातील विशेष बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी बॉयलर पेटविले आहेत; पण ऊस दराची घोषणा कोणत्याही कारखान्यांनी केलेली नाही. मात्र, यंदा उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. शिवाय उताराही चांगला मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कर्नाटकात बंपर साखर उत्पादन होणार
By admin | Updated: November 4, 2014 01:03 IST