अक्कलकोट : तालुक्यातील ७२ ग्रामपंचायत निवडणूकिचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत बुधवारी जाहीर झाली. मुंढेवाडी, बोरोटी (बु.), मूगळी, गुरववाडी, गळोरगी, हिळळी या गावात कुठे त्रिशंकू तर कुठे एका सदस्याच्या कमतरतेमुळे सत्ता काबीज करण्यासाठी रस्सीखेच होताना पाहायला मिळत आहे. दगा फटका बसू नये म्हणून यापूर्वीच सदस्यांना सहलीवर रवाना करण्यात आले.
मागील आठ दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. बुधवारी सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या हॉल मध्ये प्रांतअधिकारी दीपक शिंदे, गटविकास अधिकारी महादेव कोळी, नायब तहसीलदार बालाजी बनसोडे, नायब तहसीलदार राठोड यांच्या उपस्थित आरक्षण सोडत लहान मुलांच्या हस्ते काढण्यात आले. केवळ दीड तासात ७२ गावचे आरक्षण स्पष्ट झाले.
आरक्षणानंतर काही गावांचे सरपंचपद जुळवण्यात यश आले तर काही गावांमध्ये अपयश आले. ज्या गावात काटावर बहुमत आहे अशा ठिकाणी सदस्य पळवापळवीचा प्रकार झाला. मुरब्बी राजकारण लोकांनी यापूर्वीच स्वत:चे सदस्य सहलीवर पाठवून दिले. गुरववाडी सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण स्त्रीसाठी निघाले. यामुळे फोडाफोडीचे राजकारण झाले. वागदरी येथेही वरनाळे गटाचे नऊ सदस्य निवडूण आले. आरक्षण सर्वसाधारण वर्गाला आल्याने अनेकांजण सरपंच पदाचे स्वप्न पाहताहेत.
नागणसूर येथे अनेक दिग्गज सरपंच होण्यासाठी गुडघ्याला बाशींग बांधून तयार होते. मात्र आरक्षण ओबीसी महिलेसाठी जाहीर झाले. जेऊरचे सरपंचपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव झाले. सत्ताधारी गटामध्ये एकमेव महिला पार्वती झंपले निवडूण आल्याने त्यांनाच सरपंच करावे लागणार आहे. गौडगाव बु. येथे अनुसूची महिला आरक्षण निघाले आहे. मूगळीचे आरक्षणपद ओबीसी महिलेसाठी जाहीर झाले. याठिकाणी बिराजदार गटाला पाच तर तर विरोधी इनामदार गटाला चार जागा मिळाल्या आहेत. साफळे येथे पंचायत समिती सदस्य गटाला १५ वर्षांनी पराभूत केले. भावकीमुळे सरपंच होण्याच्या स्वप्न धुळीस मिळाले. अनुसूचित जाती पुरुष आरक्षण निघाले आहे. काझीकणबसे आरक्षण हे सर्वसाधारण निघाले आहे.
मुंढेवाडीचे आरक्षण येथे ओबीसी स्त्रीसाठी निघाले आहे. पंचायत समिती सदस्य सुरेखा गंदगे गटाने कुंभार यांना हे पद देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. बोरीटी बु चे आरक्षण हे सर्वसाधारण स्त्रीसाठी जाहीर झाले आहे. कलशेट्टी गटाचे चार तर ढंगापुरे गटाचे पाच अशी स्थिती आहे.
--
भाजपचे तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड २५ वर्षांपासून गाव ताब्यात ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत. विद्यमान सरपंचांनी दगा फटका केल्याने यंदा आरक्षणा मूळे गणित बिघडले आहे. राठोड गटाचे सात तर विरोधी गटाचे दोन सदस्य आहेत. आरक्षण अनुसूचित जातीच्या महिलेसाठी निघाले आहे. हिळळी येथे यादवाड गटाचे तीन, मुजावर गटाचे तीन, शटगार गटाचे तीन अशी सदस्य संख्या असून कोण कोणाचा पाठिंबा घेतोहेत याकडे लक्ष लागले आहे.
भोसगे गावाचे आरक्षण सर्वसाधारण पुरुषसाठी जाहीर झाले आहे. यामुळे तालुक्यात सर्वात लहान २४ वर्षाचे लक्ष्मीपूत्र रामेश्वर बिराजदार यांना संधी निश्चित मानली जात आहे.
---
फोटो : २७ भोसगे
भोसगे गावचे तालुक्यात सर्वात कमी वयाचे सरपंच होणारे लक्ष्मीपूत्र बिराजदार याना आरक्षण जाहीर होताच ग्रामस्थांनी डोक्यावर घेऊन आनंदोत्सव व्यक्त केला.