सांगोला : किसान रेल्वेला शेतकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अन्न प्रक्रिया व उद्योग मंत्रालयाने किसान रेल्वेतून वाहतुकीला भाडे दरात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ मार्च २०२२ पर्यंत ५० टक्के दर कमी केल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.
भारतीय रेल्वेने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहेत. महाराष्ट्रातून पहिली किसान रेल्वे सांगोल्यातून सुरू झाली. नाशवंत शेतीमालाची कमी वेळेत आणि कमी दरात वाहतूक व्हावी यासाठी ऑपरेशन ग्रीन अंतर्गत किसान रेल्वेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. महाराष्ट्रातून डाळिंब, केळी, संत्रा, पेरू, सिमला मिरची, खरबूज, कलिंगड, द्राक्ष या फळपिकांच्या वाहतुकीला प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे किसान रेल्वे प्रचंड लोकप्रिय झाली.
कमी वेळेत, कमी भाडे दरात जास्त अंतर पार करण्यासाठी बळीराजाकडून जास्तीत जास्त प्रतिसाद मिळत गेला.
यानंतर ऑपरेशन ग्रीन अंतर्गत किसान रेल्वेच्या भाड्यात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय ३१ मार्च २०२२ पर्यंत दिला आहे.
---
५० कोटींची तरतूद
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ऑपरेशन ग्रीन्स टॉप टू टोटल अंतर्गत शेतकऱ्यांना किसान रेल्वेच्या भाडेदरात ५० टक्के सवलत देण्यासाठी २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची तरतूद केली होती. ही सवलत ३१ मार्च २०२२ पर्यंत पुढे कायम ठेवली आहे. अर्थसंकल्पात आणखी ५० कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.
---
किसान रेल्वेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद असल्याने आणखी काही वर्षे भाडे दरात सवलत देण्याची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल, सोलापूर रेल्वे मंडल समितीचे अध्यक्ष खा. रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन किसान रेल्वेच्या भाडेदरात ३१ मार्च २०२२ पर्यंत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
- चेतनसिंह केदार-सावंत
भाजप तालुकाध्यक्ष, सांगोला