सोलापूर : जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात १९८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यातील तब्बल १७२ जणांना झालेल्या मतदानाच्या एक सष्टांशदेखील मते न पडल्यामुळे त्यांचे 'डिपॉझिट' जप्त झाले आहे. यामध्ये माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माकप नेते आडममास्तर आदींचा समावेश आहे. उर्वरित २६ जणांपैकी ११ जण निवडून आले तर १५ जणांना आपले डिपॉझिट वाचविण्यात यश आले आहे.
शहर उत्तर मतदारसंघात १९ जण उभे होते. येथे भाजपचे विजयकुमार देशमुख विजयी झाले. उर्वरित सर्वच्या सर्व १८ जणांचे डिपॉझिट जप्त झाले. यामध्ये राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, काँग्रेसचे माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांचा समावेश आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघातून भाजपचे सुभाष देशमुख हे विजयी झाले. या मतदारसंघात काँग्रेसचे आ. दिलीप माने वगळता सर्वांचे डिपॉझिट गेले. शहर मध्य मतदारसंघात तौफिक शेख आणि माजी महापौर महेश कोठे वगळता आडममास्तर, राष्ट्रवादीच्या विद्या लोलगे, भाजपच्या मोहिनी पत्की आदी प्रमुखांना डिपॉझिट वाचविता आले नाही.
करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या रश्मी बागल आणि संजय शिंदे यांनी शिवसेनेच्या नारायण पाटील यांना जोरदार टक्कर दिली. बोटावर मोजण्याएवढय़ा मतांनी बागल यांचा पराभव झाला. त्यामुळे या मतदारसंघातील बागल, शिंदे यांचे डिपॉझिट वाचले आहे. बाश्रीतून सोपलांबरोबर काट्याची लढत दिलेल्या राजेंद्र राऊत यांनीही आपले डिपॉझिट वाचविले आहे.
मोहोळमधून राष्ट्रवादीला आव्हान देणारे माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना स्वत:चे डिपॉझिटदेखील वाचविता आले नाही. अक्कलकोटमध्ये हवा निर्माण करणार्या मनसेचे फारुख शाब्दी यांच्यावरही मोठी नामुष्की ओढावली आहे. पंढरपुरातील सी.पी. बागल, बाश्रीचे राजेंद्र मिरगणे, माढय़ाचे गणपतराव (दादा)साठे यांनाही डिपॉझिट वाचविण्याएवढीदेखील मते पडली नाहीत. (प्रतिनिधी)
■ तौफिक शेख, महेश कोठे (सोलापूर शहर मध्य)
■ कल्याणराव काळे, शिवाजी सावंत (माढा)
■ रश्मी बागल, संजय शिंदे (करमाळा)
■ राऊत (बाश्री), अनंत खंडागळे (माळशिरस)
■ संजय क्षीरसागर, मनोज शेजवाल (मोहोळ)
■ प्रशांत परिचारक, समाधान आवताडे (पंढरपूर)
■ शहाजी पाटील (सांगोला)
■ दिलीप माने (द. सोलापूर)
१0४८७
'नोटा'.. ■ वरीलपैकी कोणत्याही उमेदवारास ज्याला मत द्यायचे नाही त्यांच्यासाठी ईव्हीएम मशीनवर नोटाचे बटण असून जिल्ह्यातील १0 हजार ४८७ जणांनी या नोटाचा वापर केला आहे. माढय़ात सर्वाधिक १४५९ मते नोटाला पडली आहेत. करमाळा (७३४), सांगोला (६६३),दक्षिण सोलापूर (५९६),पंढरपूर (८१९), उत्तर सोलापूर (९२८), अक्कलकोट (११३६),बाश्री (१४५५),मोहोळ (८६८),माळशिरस (१३५७),शहर मध्य (४८३) जणांनी 'नोटा'ला आपली पसंती दर्शविली आहे.
या प्रमुखांचे डिपॉझिट 'गुल'
■ माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, कामगार नेते आडममास्तर, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, दक्षिण मतदारसंघातील गणेश वानकर, बाळासाहेब शेळके, बाश्रीचे उद्योजक राजेंद्र मिरगणे, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप.