गुरुवारी सकाळपासून अक्कलकोट तहसील कार्यालयात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची गर्दी झाली होती. निवडणुकीसाठी मतदान केंद्राध्यक्ष व राखीव, सहायक, प्रथम मतदान केंद्राधिकारी, इतर मतदान अधिकारी, शिपाई अशी एकूण १ हजार ७५ जणांची नेमणूक केली आहे. या सर्वांना तीन दिवसांचे प्रशिक्षण दिले आहे. या कर्मचाऱ्यांना १४ जानेवारी रोजी ईव्हीएम मशीन, कंट्रोल युनिट २१३, बॅलेट युनिट २१५, राखीव युनिट कंट्रोल ४०, राखीव बॅलेट युनिट ४० असे विविध प्रकारचे साहित्य देऊन ज्या गावांना बस जात नाही, अशा ठिकाणी जीप, तर चांगला रस्ता असलेल्या ठिकाणी बसने रवाना केले आहे. यासाठी जीप, मिनी बस, एस. टी. बसेस अशी ४८ वाहनांची सोय केल्याचे तहसीलदार अंजली मरोड यांनी सांगितले. .
असा आहे बंदोबस्त
उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ गावांची निवडणूक असून, त्याठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्याकरिता पोलीस निरीक्षक १, सहा. पोलीस निरीक्षक ४, पोलीस उपनिरीक्षक २ असे सहा अधिकारी, ७७ पोलीस कर्मचारी, ५० होमगार्ड असा बंदोबस्त ठेवला आहे. कुरनूर, हन्नूर चप्पळगाव, बऱ्हाणपूर या संवेदनशील गावात यापूर्वी पोलीस पथ संचलन केले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक के. एस. पुजारी यांनी दिली. दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४६ ग्रामपंचायतीची निवडणूक असून, त्यासाठी पोलीस निरीक्षक १, सहाय्यक पोलीस निरीक्षक ३, पोलीस उपनिरीक्षक ४, पोलीस कर्मचारी ११०, होमगार्ड ६०, एसआरपीचे एक सेक्शन म्हणजेच १ अधिकारी, ८ कर्मचारी असा कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी दिली.
फोटो
१४ अक्कलकोट निवडणूक
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी साहित्य घेऊन नियुक्तीच्या ठिकाणी कर्मचारी निघाले.
१४ अक्कलकोट निवडणूक०१
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत.