चिपळूण : आज समाज एकमेकांपासून दूर जात आहे. स्वार्थी वृत्ती बळावत आहे. अपप्रवृत्ती वाढत आहे. अशाही परिस्थितीमध्ये काही व्यक्ती, संस्था-संघटना समाज हितासाठी कार्यरत आहेत. त्यापैकी एक म्हणजे कापसाळ गावातील एकता महिला विकास समिती. शासनाकडून कुठल्याही प्रकारचा निधी मिळत नसताना स्वसामर्थ्य व एकीच्या बळावर या महिला समितीने केलेले कार्य गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे यांनी केले. कापसाळ येथील लक्ष्मीबाई माटे संकुल सभागृहात एकता समितीच्या पंचवार्षिक कार्यअहवाल प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी गावडे म्हणाले की, सामाजिक शांती, सुरक्षा व प्रगती यासाठी संघटनात्मक कामाची गरज आहे. अंधश्रध्देच्या माध्यमातून जनतेची लूट करणाऱ्या लोकांपासून सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष भीम रास्कर यांनी राजसत्ता आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुरु असलेल्या चळवळीचा आढावा घेतला. कापसाळ गावात मागील पाच वर्षात एकता महिला समितीने स्वच्छतेपासून आर्थिक विकासापर्यंत न्यायासाठी संघर्ष करुन यश संपादन केले. जात, धर्म, पक्षविरहित कामातून विकासाला पोषक वातावरण तयार करुन गावात महिलांची चळवळ बांधली. आम्हाला मिळालेले यश हे महिलांच्या एकजुटीत असल्याचे एकता महिला गावसमिती, कापसाळ व सिमांतिनी महिला संघटनेच्या अध्यक्षा स्वाती साळवी म्हणाल्या. गाव व समाज आता एकसंघ राहिलेला नाही. घराघरात फूट पडली असून, माणुसकीचे व प्रेमाचे नाते दुर्मीळ झाले आहे. अशा परिस्थितीत एकता महिला समितीने केलेले समाज प्रबोधन व लोकविकासाचे काम गौरवास्पद असल्याचे परिवर्तनचे कार्यकारी संचालक अशोक कदम म्हणाले. यावेळी भीम रास्कर यांनी राजसत्ता आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुरू असलेल्या चळवळीचा धावता आढावा घेताना ग्रामपंचायतीच्या तसेच महिला संघटनेच्या माध्यमातून कामे करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय याविषयी विवेचन केले. यावेळी पंचायत समिती सदस्या रिया कांबळे, कापसाळ सरपंच रावी मोरे, दीपक साळवी, सतीश मोरे, संजय चांदे, कृष्णदास नलावडे यांनी समितीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. संघटनेच्या उपाध्यक्षा मंजुषा साळवी यांनी समितीच्या भविष्यातील योजनांबद्द माहिती दिली. यावेळी महिलांनी ‘स्वच्छतेचे महत्त्व’ या विषयावर सादर केलेला मूक अभिनय व ‘जात्यावरची ओवी’ हे कार्यक्रम विशेष आकर्षणाचे ठरले. कार्यवाह शामल कदम यांच्यासह महिलांनी हे सादरीकरण केले. यावेळी कार्याध्यक्ष मीनल बांदेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एकता समितीच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)पक्षविरहीत काम : महिलांची सक्षम चळवळकापसाळ गावी पाच वर्षात एकता महिला समितीने स्वच्छतेपासून आर्थिक विकासापर्यंत न्यायासाठी संघर्ष करून यश संपादन केले. जात, धर्म, पक्षविरहीत कामातून विकासाला पोषक वातावरण तयार करताना महिलांची सक्षम चळवळ बांधली, आम्हाला मिळालेले यश हे महिलांच्या एकजुटीत आहे, असे स्वाती साळवी म्हणाल्या.आज समाज एकमेकांपासून दूर जात आहे. स्वार्थी वृत्ती बळावत आहे.कुठल्याही प्रकारचा निधी मिळत नसताना महिलांना केले कार्य.सामाजिक शांती, सुरक्षा व प्रगती यासाठी संघटनात्मक कामाची गरज.स्वच्छतेचे महत्त्व विषयावर मूक अभिनय सादर.
महिलांच्या एकीचे बळ कौतुकास्पद
By admin | Updated: March 11, 2017 21:12 IST