सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असले तरी हत्ती किंवा जंगली प्राण्यांना झाडे उंच वाढल्याने खाद्य मिळत नाही आणि त्यामुळेच जंगली प्राणी जंगलाकडून नागरीवस्तीमध्ये प्रवेश करू लागले आहेत. यासाठी आता काही ४० वर्षे झालेली झाडे तोडल्यास त्यांना नव्याने फुटवे येवून हे खाद्य उपलब्ध होईल यासाठी तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी दिली.याबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४४ हजार हेक्टर क्षेत्र वनखात्याच्या ताब्यात असून या क्षेत्रात जंगल आहे. या जंगलाची गेल्या ४० वर्षात तोड न झाल्याने झाडे उंच गेली आहेत. त्यामुळे हत्तींना जंगलात खाद्य मिळेनासे झाले आहे आणि त्यामुळेच या हत्तींनी जंगल सोडून नागरी वस्तीतील शेती, बागायतीत आपले खाद्य शोधले आहे. या जंगलामध्येच हत्तींना खाद्य उपलब्ध करून द्यायचे झाल्यास ४० वर्षे झालेल्या झाडांची काही प्रमाणात तोड करून किंवा नवीन झाडांच्या लागवडी करून ते खाद्य उपलब्ध होईल यासाठी वनविभागाने प्रयत्न करावा असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.दोडामार्ग तालुक्यातील तिलारी पट्ट्यात आणखी पाच हत्ती दाखल झाल्याचे सांगण्यात येते. या पाचपैकी एका हत्तीचा माग वनविभागाने काढला असून हा सर्वात मोठा हत्ती आहे. हे वनविभागाला मिळालेल्या छायाचित्रावरून स्पष्ट झाले आहे. तर जिल्ह्यात नव्याने आलेले हत्ती शोधण्याचा प्रयत्न वनविभागाकडून सुरु आहे तर यापूर्वी दाखल असलेल्या तीन हत्तींपैकी दोन हत्तींची कार्यपद्धतीत बदल झाला असून त्याचेही परीक्षण वनविभाग करीत आहे.कर्नाटकातून टीम येणारसिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल असलेल्या हत्तींना पकडून त्यांना कर्नाटक राज्यात सोडण्यासाठी व त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी या जिल्ह्यात लवकरच हत्तींना प्रशिक्षित करणारी एक टीम येत आहे. येथील हत्तींना शोधून त्यांना खाद्यातून अथवा शुटींगद्वारे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात येईल व पकडून त्यांना ही टीम घेऊन जाईल. म्हणून प्रथम सर्वेक्षणासाठी ही टीम येणार आहे असे यावेळी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी सांगितले.भूसंपादन लवकरचमालवण येथील सी वर्ल्ड प्रकल्पासाठी ५० कोटीचा निधी पर्यटन विभागाकडे प्राप्त झाला आहे. हा निधी वर्ग होताच या प्रकल्पाच्या भू संपादनास प्रत्यक्ष प्रारंभ होईल. या क्षेत्राची मोजणी पूर्ण झाली असून भू संपादनाचा प्रस्ताव तयार असल्याचेही जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
झाडे तोडण्याचा प्रस्ताव पाठविणार
By admin | Updated: July 17, 2014 23:08 IST