सावंतवाडी : कोकणातील पर्यटनस्थळांचा ग्रामविकास विभागामार्फत विकास करण्यासाठी ‘ग्रामपर्यटन’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. यासाठी ६१ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरिराज यांनी दिली. ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंग, नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, पर्यटन विभागाचे अधिकारी माने,आदी उपस्थित होते. व्ही. गिरिराज यांनी सावंतवाडी नगरपालिकेने बांधलेल्या शिल्पग्राम तसेच हेल्थफार्म या प्रकल्पांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून तसेच नगराध्यक्षांकडून सर्व माहिती घेतली. यावेळी व्ही. गिरिराज म्हणाले, कोकणात ठाण्यापासून सिंधुदुर्गपर्यंत अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्या माध्यमातून ग्रामीण विकास विभाग काय करू शकतो काय, हे पाहावे लागेल. आम्ही प्रत्येक जिल्ह्यातील छोट्या-छोट्या उद्योजकांना भेटून त्यांना या पर्यटनाचे महत्त्व पटवून देत आहोत. पर्यटन विभागाच्या निवास न्याहारी योजनेच्या माध्यमातून आणखी काय करता येईल, याची माहिती घेणार आहे. (प्रतिनिधी)सिंधुदुर्गला ११ कोटींचा निधीसिंधुदुर्ग जिल्ह्याला ग्रामीण विकास विभागाकडून ११ कोटींचा निधी प्राप्त झाला असून, त्यामध्ये अनेक प्रकल्पांना चालना देण्यात येण्यासारखी आहे, असेही त्यांनी सांगितले. शनिवारी रत्नागिरीतील उद्योजकांच्या भेटी घेतल्या असून, रविवारी सिंधुदुर्गमधील उद्योजकांना भेटणार असल्याचेही ते म्हणाले. ग्रामीण भागात छोटी-छोटी घरे करून ती पर्यटकांना देता येतात. त्याबाबत आमचा विभाग नियोजन करणार आहे. ग्रामीण भागातील लोकांकडूनही त्याच्या सूचना घेत आहोत. त्यातून काय नवीन करता येते काय, याचाही अभ्यास करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोकणात ‘ग्रामपर्यटन’ राबविणार : व्ही. गिरिराज
By admin | Updated: August 2, 2015 23:47 IST