कणकवली : गिरणी कामगारांच्या स्वप्नांना तिलांजली देण्याचा कामगारांच्या इतर संघटनांचा प्रयत्न आहे. सरकारशी हात मिळवणी केलेल्या नेत्यांच्या संघटना कामगारांचे भले करणार नाहीत. गिरणी कामगारांच्या भावनांशी खेळू नका. मुंबईतच घरे देणे सरकारला शक्य आहे. आम्ही या वर्षात गिरणी कामगारांना घरे मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. इतर संघटनांनी कामगारांच्या जीवावर आखलेले षड्यंत्र हाणून पाडू, असा इशारा गिरणी कामगार वारसा उत्कर्ष महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रकाश नाईक यांनी दिला. येथील भगवती मंगल कार्यालयात महासंघाचा मेळावा झाला. या मेळाव्याला कार्याध्यक्ष भगवान शिंदे, कोषाध्यक्ष दिपक कदम, सरचिटणीस आनंद मोरे, सहचिटणीस सुरेश वाईरकर, सदस्य बापू बागडी, सुरेश यादव, महिला संघटक अनिता ढवळ, सुचिता शिंदे, सिंधुुदुर्ग जिल्हाप्रमुख दिलीप कुडाळकर, वैभववाडी तालुका संघटक मनोहर दळवी, देवगड तालुका संघटक बाबाजी लोके, संदीप डामरे, कुडाळ तालुका संघटक विलास राऊळ, वेंगुर्लेचे शरद परब, मालवणचे बाळू परब, कणकवलीचे अनंत कांडर, दोडामार्गचे भाऊ राणे, सावंतवाडीचे मुकुंद परब, हेमंत परब आदी उपस्थित होते. नाईक म्हणाले की, वारस उत्कर्ष महासंघ कामगारांच्या हातात हात घालून चालणार आहे. कामगार वयोवृद्ध होत चालले आहेत. कामगारांनी चळवळीत सामील व्हावे. दहा कलमी कार्यक्रम इतर संघटनांनी बाजूला ठेवून फक्त गिरणी कामगारांना बाहेर घालवण्याचा कार्यक्रम आखला आहे. मुंबईत घरे देऊ ही घोषणा हवेत विरली आहे. गिरणी कामगारांकडे वारसा प्रमाणपत्र मागून त्रास दिला जातोय. लॉटरीत घरे लागलेल्या बेकार झालेल्या कामगारांना कर्ज कोण देणार हा प्रश्न आहे. संघटनांच्या नादानपणाने कामगार आत्महत्या करत आहेत. संघटनांनी कामगारांच्या भावनांचा बाजार मांडला आहे. कामगारांनी काळाची पावले ओळखून जागे व्हा. सरचिटणीस आनंद मोरे म्हणाले की, इतर संघटनांनी भूलथापा मारून कामगारांना सतवले. त्यामुळे वारसा महासंघाची स्थापना करावी लागली. लॉटरीत ६९२५ जरांना घरे लागली. उर्वरितांनाही घरे मिळावीत यासाठी आम्ही न्यायालयात जाणार होतो. परंतु आम्हाला दाबण्यात आले. कल्याणकारी महासंघाने गिरणी मालक व सरकारशी संघटनांच्या नेत्यांनी संधान बांधले. सूत्रसंचालन जिल्हाप्रमुख दिलीप पेडणेकर यांनी केले. ते म्हणाले की, कुठल्या तरी संघटनेच्या मागे धावू नका. (प्रतिनिधी)
कामगारांना घरे मिळवून देणार $: प्रकाश नाईक
By admin | Updated: May 12, 2014 00:13 IST