फुणगूस : वन विभागाचे दुर्लक्ष आणि कातभट्ट्यांचे वाढते प्रमाण यामुळे कोकणात सर्वात जास्त प्रमाण आढळणाऱ्या खैर वृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वन विभागाने वेळीच या वृक्षाच्या तोडीवर बंदी घालून या वृक्षाचे संवर्धन करावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून केली जात आहे.कोकणात थंडीचा हंगाम सुरु झाला की, अनेक ठिकाणी कात तयार करणाऱ्या कातभट्ट्यांना रितसर परवानगी असते, तरी आडगावात असलेल्या अनेक हातभट्ट्या बेकायदेशीर असतात.काताचा उपयोग विड्याच्या पानासाठी, तर करतातच पण रंग उत्पादनासह अन्य उत्पादनासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. काताला मोठी मागणी आहे. या व्यवसायातून अधिकाधिक नफा मिळत असल्याने थंडीच्या काळात कातभट्टी व्यवसायाला ऊत येतो. कात तयार करण्यासाठी खैराच्या झाडांची आवश्यकता असल्याने गेल्या काही वर्षात तालुक्यात खैर वृक्षाची बेसुमार तोड होते. वन विभाग या तोडीकडे लक्ष देत नसल्याने खैर वृक्ष नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे. खैर वृक्ष बारीक पानांचा असून, लहान काटे, काळसर सालीचा व १५ फूट उंचीचा असतो. पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी शोषून घेणारा हा वृक्ष थंडीच्या हंगामात तजेलदार असतो. कोकणात खैर ही शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवून देणारी वनस्पती. याचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो. पूर्वी खैराची तोड या भागात मोठ्या प्रमाणावर होत होती. मात्र, आता गावपातळीवरील ग्रामस्थांच्या जागृतीमुळे खैराची तोड कमी प्रमाणात होत असली तरी मधल्या काळात झालेल्या तोडीमुळे या भागातील खैर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. भर पावसाळ्यात पडीक जमिनीत खैर लागवड करुन दुर्मीळ होत चाललेला हा वृक्ष संवर्धित करण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)ग्रामीण संस्कृतीशी खैर निगडीत. खैराचे मूळ काढून विकण्याची प्रथा. कोकणात कातभट्ट्यांचे प्रमाण मोठे. घर दुरूस्ती किंवा मुलाची फी भरायला विकले जायचे खैर. पडीक जमिनीत लागवड करा. वृक्ष संवर्धन करण्याची गरज.
कोकणातून खैर नामशेष होण्याच्या मार्गावर
By admin | Updated: October 17, 2014 22:58 IST