कणकवली : राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे मंत्रीपद स्वीकारल्यानंतर सोमवारी प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. भाजपातर्फे तावडे यांचे स्वागत करण्याची जोरदार तयारी करण्यात आली असून शिक्षणमंत्री विविध शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक संस्था, क्रीडा संस्था, नागरिक, कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली.शिक्षणमंत्री तावडे यांच्या जिल्हादौऱ्यासंदर्भात भाजपाच्या जिल्हास्तरीय कोअर टीमची बैठक येथील विश्रामगृहात घेण्यात आली. यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा राजश्री धुमाळे, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य राजू राऊळ, जिल्हा उपाध्यक्ष हरेश पाटील, सरचिटणीस चारूदत्त देसाई, जयदेव कदम, प्रमोद रावराणे, सोशल मीडिया सेलचे प्रभाकर सावंत, मिलिंद केळुसकर, तालुकाध्यक्ष शिशिर परूळेकर आदी उपस्थित होते. काळसेकर म्हणाले की, कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर विनोद तावडे यांचा पहिलाच जिल्हा दौरा आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता मुडेश्वर मैदानावरील हेलिपॅडवर तावडे यांचे आगमन होईल. तेथून विश्रामगृहावर आल्यानंतर आप्पासाहेब पटवर्धन चौकात भाजपातर्फे त्यांचे जल्लोषी स्वागत केले जाईल. तेथून जानवली येथील वृंदावन मंगल कार्यालयात जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक संस्था, क्रीडा संस्था प्रतिनिधी, नागरिक तसेच भाजपा कार्यकर्त्यांशी विनोद तावडे थेट संवाद साधतील. सर्वांसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम होईल. शुभेच्छा व निवेदने स्वीकारतील. शालेय शिक्षण, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा, मराठी भाषा व सांस्कृतिक विभाग अशा सहा खात्यांची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे आहे. त्यासंबंधी असलेले प्रश्न थेट संवादातून तावडे समजून घेतील. दुपारी २.१५ नंतर जिल्ह्यातील सर्व खातेप्रमुखांची विश्रामगृहावर बैठक होईल. या बैठकीत जिल्ह्यातील विकासकामांचा विनोद तावडे आढावा घेणार आहेत. या बैठकीला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व खात्यांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. आघाडी शासनाच्या काळात परस्पर काही समित्यांवर नेमणुका करण्यात आल्या. त्याचा आढावा घेऊन शासकीय पातळीवर अनेक बदल करण्यात येणार आहेत. त्याची सुरूवात सोमवारपासून होईल. भाजपाचा राज्यातील सत्तेत आता शंभर टक्के वाटा असल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळणार आहे. आघाडी शासनाच्या काळात अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. ते सोडविण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे. जनतेने सोमवारच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले म्हणणे खुलेपणाने मांडावे, असे आवाहन अतुल काळसेकर यांनीकेले. (प्रतिनिधी)
विनोद तावडेंचे आज जिल्ह्यात स्वागत
By admin | Updated: December 1, 2014 00:23 IST