सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत विशेष घटक योजनेतून सन २00२ मध्ये घेण्यात आलेली सुकळवाड पाताडेवाडी येथील नळपाणीपुरवठा योजना तब्बल १२ वर्षानंतरही अपूर्णावस्थेत आहे. याकडे ग्रामपंचायतीकडून डोळेझाक होत असल्याने पाताडेवाडी मागासवर्गीय ग्रामस्थ पाण्यापासून वंचित राहिले आहेत. तरी नळयोजना पूर्ण करुन पाणी प्रश्न सोडवावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पाताडेवाडी ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.सुकळवाड पाताडेवाडी या मागासवस्तीमध्ये समाजकल्याण विभागामार्फत विशेष घटक योजनेंतर्गत सन २00२ मध्ये नळपाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेच्या कामाचा ठेका ग्रामपंचायत सुकळवाडने घेतला होता. यामध्ये विहीर खोदाई, बांधकाम पाईपलाईन, वीजमिटर, पंप, फिटिंग आदी कामे झाली. मात्र, पाण्याची साठवण टाकी अद्याप बसविण्यात आली नाही. या कामावर शासनाचे लाखो रुपये खर्च होऊनही तेथील रहिवाशी गेली १२ वर्षे पाण्यापासून वंचित राहिले आहेत. नळयोजनेचे अपूर्ण राहिलेले काम सुकळवाड ग्रामपंचायतीने पूर्ण करावयाचे असताना काम पूर्ण नसल्याने ही योजना ग्रामपंचायत ताब्यात घेत नाही. गेली १२ वर्षे लक्ष वेधूनही याकडे ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष केला जात आहे. ही पाताडेवाडीतील मागासवर्गीयांची क्रूर चेष्टा आहे. १२ वर्षात चार सरपंचानी सुकळवाड ग्रामपंचायतीवर कारभार केला. तरीही पाण्याचा प्रश्न कायम आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण नको म्हणून ग्रामस्थांनीच पाण्याची साठवण टाकी नसताना पंपाने थेट पाणीपुरवठा करण्यास २00५ सालापासून सुरुवात केली. वीज बिल, देखभाल दुरुस्तीवर गेली ९ वर्षे ग्रामस्थ खर्च करीत आहेत. सन २00२ ते २0१४ अशी १२ वर्षे अपूर्णस्थितीत असलेली योजना मोठ्या दुरुस्तीस आली आहे. यासाठी येणारा खर्च कोण करणार? हा प्रश्न आहे. याकडे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी पाताडेवाडी ग्रामस्थांनी सुकळवाड सरपंच, मुख्य कार्यकारी अधिकारी, समाजकल्याण सभापती, गटविकास अधिकारी मालवण यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. पाताडेवाडी नळयोजनेचे काम तत्काळ पूर्ण करावे, पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)
पाण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा
By admin | Updated: July 25, 2014 22:53 IST