सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत दुर्धर आजारी रूग्णांसाठी आर्थिक मदत देण्याची योजना राबविण्यात आली असली तरी गेले सहा महिने जिल्ह्यातील दुर्धर आजारी रूग्ण मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, या विभागाकडून वेळकाढू धोरण अवलंबले जात असल्याने जीवंतपणी ही मदत मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील दुर्धर आजारी रूग्णांना औषधोपचारासाठी आर्थिक मदत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यातील अनेक रूग्णांनी या लाभासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. प्रस्ताव सादर करून सहा महिने उलटले तरी अद्याप काही रूग्णांना जिल्हा परिषदेकडून मदतीची रक्कम देण्यात आलेली नाही. यासाठी काही रूग्ण व त्यांचे नातेवाईक या मदतीसाठी गेले सहा महिने या कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहेत. मात्र, अद्यापही काही रूग्ण या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या या दुर्धर आजारी रूग्णांच्या औषधोपचारासाठी आर्थिक मदत योजनेंतर्गत देण्यात येणारी तुटपुंजी १५ हजारपर्यंतची मदतही या रूग्णांना वेळेत मिळत नाही. त्यामुळे रूग्णांना जिल्हा आरोग्य विभागाच्या अनेक वाऱ्या कराव्या लागत आहेत. या योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रासह १५ हजाराची औषध बिले जोडावी लागतात. त्यामुळे काही रूग्णांकडे औषध बिले सापडत नसल्याने जेवढी बिले सादर केली जातात तेवढीच मदत दिली जाते. त्यामुळे काहींना तर अगदीच तुटपुंजी मदत मिळते. तरीही या विभागाकडून ही मदत देण्यास वेळकाढू धोरण अवलंबिले जात असल्याने भीक नको पण कुत्रा आवर असे म्हणण्याची वेळ आली आहे. रूग्ण जीवंत असेपर्यंत तरी ही मदत मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुर्धर आजारी रूग्णांना देण्यात येणारी आर्थिक मदत वेळेत द्या, अशी मागणी समिती सदस्यांकडून वेळोवेळी होत असतानाही जिल्ह्यातील दुर्धर आजारी रूग्णांचे प्रस्ताव मंजुरीसह प्रत्यक्ष मदत देण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्यापही काही रूग्ण मदतीच्या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. रूग्णांना मदत की देणगी? गोरीगरीब दुर्धर आजारी रूग्णांना औषधोपचारासाठी हातभार लागावा यासाठी ही आर्थिक मदतीची योजना अंमलात आली. दुर्धर आजारी रूग्णांच्या उपचारासाठी लाखो रूपये खर्च होतात. त्यामुळे संबंधित गरीब कुटुंब आर्थिक संकटात सापडते. त्यांना थोडीफार आर्थिक मदतीचा हात द्यावा या दृष्टीने ही योजना राबविण्यात येत असली तरी जिल्हा परिषदेकडून देण्यात येणारी तुटपुंजी मदतही वेळेत रूग्णांना मिळत नाही ही शोकांतिका आहे. त्यासाठी रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अनेकवेळा कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. वास्तविक ही मदत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत संबंधित रूग्णांच्या घरपोच होणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी रूग्णांना हेलपाटे मारावे लागत आहेत. दुर्धर आजाराने ग्रासलेल्या संबंधित रूग्णाला आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत मिळविण्यासाठीही त्रास सोसावे लागत आहेत. त्यामुळे रूग्णांना मदत की देणगी? असा प्रश्न रूग्णांच्या नातेवाईकांना पडला आहे. (प्रतिनिधी)
दुर्धर आजारी रूग्ण मदतीच्या प्रतीक्षेत
By admin | Updated: August 1, 2014 23:25 IST