कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५२ पैकी सुमारे ३५ ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेला यश मिळाले आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेने शिवसेनेप्रती प्रेम व्यक्त केले असून हा विश्वास निश्चितच सार्थ ठरविण्यात येईल असे सांगतच येथील मतदारांनी काँग्रेसला त्यांची जागा दाखविली असल्याची टीका शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केली. येथील संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख सचिन सावंत उपस्थित होते. आमदार नाईक म्हणाले, जिल्ह्यातील ५२ पैकी एक दोन ग्रामपंचायती वगळता सर्वच ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व होते. परंतु निवडणूक निकालानंतर शिवसेनेच्या बाजूने मतदारांनी कौल दिला आहे. शिवसेनेचा जनाधार वाढत असल्याचेच हे लक्षण आहे. कुडाळ तालुक्यातील आकेरी, गोठोस, कुपवडे, पोखरण, माड्याचीवाडी, गिरगाव-कुसगाव, सावंतवाडी तालुक्यातील आंबोली, इन्सुली, कोलगाव, मळगाव, मळेवाड, आरोस, दांडेली, मालवण तालुक्यातील चिंदर, मसदे, विरण, वेंगुर्ले तालुक्यातील आरवली, कणकवली तालुक्यातील तोंडवली-बावशी, वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे, खांबाळे, वेंगसर, कुंभवडे, दोडामार्ग तालुक्यातील कुडासे, नेरे, नेवाळे, देवगड तालुक्यातील धालवली आणि अन्य ग्रामपंचायतींवर शिवसेना-भाजप युतीने विजय मिळविला आहे. त्यामुळे काँग्रेस पिछाडीवर गेला असून जनतेचा विश्वास सार्थ होईल. (वार्ताहर)
मतदारांनी काँग्रेसला जागा दाखविली
By admin | Updated: April 24, 2015 01:31 IST